पाचोरा,(प्रतिनिधी)- पाचोरा न्यायालय येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मा. श्री. जी.बी. औंधकर यांच्या न्यायालयात ८ वर्षे जुने सुरु असलेल्या चेक बांऊस दोन खटल्यात वेगवेगळ्या आरोपींना दिनांक २३ जानेवारी रोजी एकाच दिवशी शिक्षा सुनावण्यात आली. फिर्यादी अमीत संघवी यानी आरोपी प्रेमचंद जाधव व श्रीराम भिका पाटील यांच्या विरुध्द धनादेश अनादर प्रकरणी दोन वेगवेगळे खटले दाखल केले होते. त्या कामी उभय पक्षकारांचा पुरावा विचारात घेऊन न्यायालयाने दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींना कडक शिक्षा सुनावत आरोपींनी एक वर्ष कारावासाची शिक्षा तसेच चेक रकमेच्या दुप्पट नुकसान भरपाई प्रत्येकी रुपये १,८०,०००/- व रुपये २,५०,०००/- देण्याचा तसेच चेक रकमेवर ९% सरळ व्याज तसेच खटल्याचा खर्च रुपये ५०००/- फिर्यादीस देण्याबाबतचा आदेश केला.
चेक अनादर प्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार एकाच दिवशी दोन प्रकरणात कडक शिक्षा झाल्याने परिसरात निकालाबाबत चर्चा झाली आहे. फिर्यादी पक्षातर्फे विधीज्ञ अनिल पी. पाटील यांनी कामकाज पाहिले, चेक अनादर प्रकरण लोकन्यायालयात तडजोड होण्यायोग्य असल्याबाबत देखील मे. न्यायालयाने निष्कर्ष नोंदवले आहेत.