जळगाव,(प्रतिनिधी)- आगामी लोकसभेच्या तोंडावर भाजपात इनकमिंगचे वारे वाहू लागले असून राज्यात अजून बरेच ‘राजकीय भूकंप’ होतील असं म्हटलं जातं आहे.दरम्यान आज जळगाव जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते डॉ. उल्हास पाटील व त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील भाजपात प्रवेश करणार आहेत, डॉ. उल्हास पाटीलांच्या भाजप प्रवेशाने जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मोठी हानी होईल हे निश्चित… दरम्यान मंत्री गिरीश महाजन यांचे जामनेर विधानसभा मतदार संघातील कट्टर राजकीय विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) संजयदादा गरुड देखील भाजपाच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो आणि कुणी मित्र नसतो. याची प्रचिती जामनेर तालुक्यात येत्या काही दिवसात पाहायला मिळू शकते.
आयोध्यातील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित एका शोभायात्रेच्या निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) संजयदादा गरुड व मंत्री गिरीश महाजन यांच्यात भेट झाल्याचं समजतं भेटीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले असून दोघांमधील चर्चा मात्र समजू शकली नाही. भाजपा प्रवेशा संदर्भात अद्याप संजय गरुड अथवा गिरीश महाजन यांनी जाहीर केलेले नाही. जामनेर तालुक्यातील मंत्री गिरीश महाजन यांचे राजकीय कट्टर विरोधक असलेले संजय गरुड भाजप मध्ये आल्यास भाजपाची ताकद वाढणार असून विरोधकच शिल्लक राहणारं नाही अशी परिस्थिती निर्माण होईल.
नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपाने ‘अबकी बार ४०० पार’असा नारा देत तयारी सुरु केली आहे.यासोबतच इतरही राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.दरम्यान राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत काही दिवसापूर्वी मोठं विधान केलं होतं.महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या १५ ते २० दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केला होता त्या सोबतच त्यांनी विरोधक शिल्लक राहणारं नसल्याचे सांगितले होते.संजय गरुड हे जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहेत ते भाजपात लवकरच प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होतं आहे, यामुळेचं कदाचित मंत्री महाजन यांनी जामनेर तालुक्यात विरोधक शिल्लक राहणारं नसल्याचं सूचक वक्तव्य केलं असावं.
तर समीकरणे बदलणार
आगामी लोकसभा निवडणूकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते असलेले संजय गरुड हे गिरीष महाजन यांच्या सोबत भाजपात आल्यास लोकसभेला समीकरण बदलण्याची शक्यता आहे.त्याच बरोबर तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात, हेही तितकेच खरे आहेत.आगामी लोकसभा निवडणूकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते असलेले संजय गरुड भाजप प्रवेशा संदर्भात काय निर्णय घेता याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.