सावदा (प्रतिनिधी) – सावदा शहरातील काही भागांमध्ये शुक्रवार रात्री 10 वाजेच्या सुमारास बुधवार पेठ भागात सजावट तसेच पताका लावण्याचे काम सुरू असताना वाद होऊन दगडफेक झाली यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली.
या बाबत वृत्त असे की, शुक्रवार रात्री दहा वाजेच्या सुमारास शहरात ठिकठिकाणी काही कार्यकर्ते शहर सुशोभीकरणाचे काम करत होते. यात शहरातील बुधवार पेठ, चांदणी चौक आणि गांधी चौक या भागात देखील हे सजावट करून पताका लावण्याचे काम सुरू असतांना अचानक अज्ञात लोकांनी जोरदार दगडफेक केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही क्षणातच मोठी धावपळ उडाली, दरम्यान घटनास्थळी जमाव पांगविण्याचे काम पोलीस कर्मचारी करीत असतांना त्यांना देखील यात दगड लागण्याने यात पो, कॉ, मनोज रुबाब तडवी व पो,कॉ, राजेंद्र पुरुषोत्तम कोळी यांचे खांद्यास व पोटास मार लागल्याने जखमी झाले,
या बाबत पो,कॉ मनोज रुबाब तडवी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून सावदा पो.स्टे. ला, 1) शरीफ बिस्मिल्ला पिंजारी, 2) मोईन सलीम सैय्यद यांचे सह इतर 20 ते 25 जणा विरुद्ध सावदा पोलीस स्टेशनला गुरनं. 12/2024 भादवि क. 353,332,337,143,147, महा. पोलीस 37 (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास स.पो.नी. जालिंदर पळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक विनोद खांडबहाले करीत आहे
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक एस राजकुमार, फैजपूर विभागाचे प्रांतअधिकारी देवयानी यादव, डीवायएसपी राम शिंदे, राजकुमार शिंदे रावेर तहसिलदार बंडू कापसे, नायब तहसिलदार संजय तायडे आदींनी भेट देऊन पाहणी केली तर सपोनि जालींदर पळे, फैजपूरचे सपोनि निलेश वाघ, निंभोरा पोलीस स्थानकाचे सपोनि हरीदास बोचरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली सध्या शहरात शांतता असून दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू आहे,