जळगाव,(प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले हे गेल्या दीड वर्षापासून फरार होते. अखेर आज सोमवार दिनांक १५ जानेवारी रोजी सकाळी पोलीस अधिक्षक कार्यालयात शरण आले आहे. यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करून समाजात तेढ निर्माण केल्याचा प्रकार किरणकुमार बकाले यांनी केला होता. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात विनोद देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार हे दीड वर्षांपासून फरार होते. त्यांचे निलंबन करून नाशिक येथे हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतू ते हजर न होता फरार झाले होते. त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी स्थानिक न्यायालयासह उच्च न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाकडून त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला होता. त्यामुळे बकाले यांच्या पदरी निराशा पडली होती. यातच पोलीस प्रशासनाने त्यांची मालमत्ता जप्त करण्याबाबत न्यायालयात अर्ज केला होता. अडचणीत वाढ होत असल्याने अखेर किरणकुमार बकाले यांनी सोमवारी १५ जानेवारी रोजी सकाळी पोलीस अधिक्षक कार्यालयात येवून हजर झाले आहे.सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावीत यांच्याकडे बकाले यांनाहजर करण्यात आले असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे.