नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी होणाऱ्या श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेपूर्वी शुक्रवारपासून ११ दिवसांच्या विशेष अनुष्ठानास प्रारंभ केला आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील नाशिकमधून या अनुष्ठानाची सुरूवात झाली आहे. श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष अनुष्ठानास प्रारंभ केला आहे. त्याची माहिती पंतप्रधानांनी शुक्रवारी एका संदेशाद्वारे दिली. ही खूप मोठी जबाबदारी आहे. आपल्या धर्मग्रंथांमध्ये म्हटल्याप्रमाणे, आपण यज्ञासाठी आणि त्याच्या पूजेसाठी स्वतःमध्ये दैवी चेतना जागृत केली पाहिजे.
यासाठी धर्मग्रंथांमध्ये उपवास आणि कठोर नियम विहित करण्यात आले आहेत, जे प्रतिष्ठापनेपूर्वी पाळावे लागतात.म्हणून, काही धर्मात्मा आणि आध्यात्मिक प्रवासातील थोरांकडून मला मिळालेल्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांनी सुचवलेल्या ‘यम-नियमां’ नुसार, मी आजपासून ११ दिवसांचा एक विशेष विधी सुरू करीत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
श्रीराममंदिर प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर रामभक्तीच्या भावनोत्कटतेत सारा देश दंग असल्याची दखल पंतप्रधानांनी आपल्या भावनिक संदेशात घेतली आहे. ते म्हणाले की, हा क्षण सर्वशक्तिमान ईश्वराचे आशीर्वाद असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले, “माझे मन भरुन आले आहे! माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी अशा भावनोत्कटतेचा अनुभव घेत आहे, मी भक्तीची एक आगळी भावना अनुभवत आहे. माझ्या अंतर्मनाचा हा भावनिक प्रवास अभिव्यक्तीची नव्हे तर अनुभवाची संधी आहे.तो मांडण्याची माझी इच्छा असली तरी त्याची सखोलता, व्यापकता आणि तीव्रता मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, असेही पंतप्रधानांनी नमूद केले आहे.