राम मंदिर उद्घाटनाचा सोहळा येत्या २२ जानेवारीला अयोध्येत सपंन्न होणार आहे. या क्षणाकरिता तब्बल तीन दशकांची वाट पाहावी लागली. याच पार्श्वभूमीवर अयोध्येतील एका साधूची (करपात्री जी महाराज) २२ वर्षांची तपश्चर्यादेखील राम मंदिर उद्घाटनादिनी पूर्ण होणार आहे. या २२ वर्षांच्या कालावधीत त्यांनी एकदा अन्न न खाण्याचा किंवा शिवलेले कपडे घालण्याचा संकल्प केला होता.
दरम्यान, रामलला अयोध्येच्या राम मंदिरात विराजमान होणार असून तेव्हा या संताचा संकल्पही पूर्ण होताना दिसत आहे. आता प्राणप्रतिष्ठापनेनंतर प्रभू रामाची परवानगी घेतल्यानंतर ते पोटभर जेवतील. यासंदर्भात ‘द राजधर्म’ या यूट्यूब चॅनलशी झालेल्या संवादात त्यांनी ही माहिती दिली.
ते पुढे म्हणाले, “मी शिवलेले कपडे न घालण्याचा संकल्प केला आहे. मी खडाऊ घालीन. तोपर्यंत मी असाच राहीन. तेव्हापासून माझी तपश्चर्या चालू आहे. 22 रोजी जेव्हा माझ्या देवाची त्यांच्या घरी स्थापना होईल, तेव्हा मी त्यांची परवानगी घेईन आणि पोटभर जेवण करेन. मी शिवलेले कपडे घालू लागेन, कारण आमचे वचन आमच्या देवाने पूर्ण केले आहे.”, अशा भावना त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या आहेत.