जळगाव, ५ जानेवारी (प्रतिनिधी) – जिल्ह्यात खेडी येथे होणारे वारकरी भवन राज्यातील एकमेव असा पायलट प्रकल्प आहे. वारकरी भवनाचे बांधकाम गुणवत्तापूर्ण होईल. याची दक्षता घ्यावी. तसेच आचारसंहिता लागण्यापूर्वी जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यात यावे. अशा सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाकाजाचा आढावा पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी ग्रामविकास, पर्यटन व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, आमदार लता सोनवणे, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, फैजपूर उपविभागीय अधिकारी देवयानी यादव, महानगरपालिका आयुक्त विद्या गायकवाड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, गिरीष सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
यावेळी वारकरी भवन, महिला भवन, रामानंद पोलीस स्टेशन बांधकाम प्रगती, जिल्ह्यातील इतर पोलीस स्टेशन प्रगती, सीसीटीव्ही कामाबाबत प्रगती व इतर प्रलंबित विषयाबाबत केंद्र व राज्य शासनाद्वारे प्राप्त विविध निधीअंतर्गत सुरू असलेली कामांची प्रगती तसेच जळगाव मनपा रस्त्यांच्या कामांबाबत आढावा घेण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्हा नियोजन निधीच्या माध्यमातून जळगाव शहरात रामानंद नगर पोलीस स्टेशन इमारतीचे बांधकाम करणे (४ कोटी ४४ लाख), वारकरी भवन इमारतीचे बांधकाम करणे-टप्पा-१ (६ कोटी ६ लाख), महिला बाल विकास भवन इमारतीचे बांधकाम करणे (५ कोटी), कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बहिणाबाई चौधरी यांचा पुतळा बसविणे (१ कोटी ९९ लाख) आदी कामे करण्यात येणार आहेत. ही सर्व कामे सध्या निविदास्तरावर असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, वारकरी भवन बांधकाम झाल्यानंतर वारकरी विश्वस्तांकडे हस्तांतरित करण्यात यावा. जेणेकरून देखभाल चांगल्या पध्दतीने राहिल. स्वच्छता राहिल. असे ही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
जळगाव शहरातील अंतर्गत रस्त्यांची कामे करतांना महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वय ठेवून काम करावे. असे ही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुक्ताईनगर येथील राज्य महामार्गावरील अतिक्रमण पुढील आठ दिवसांच्या आत काढण्यात यावेत. फेब्रुवारी २०२४ पर्यंत सर्व कामांचे कार्यादेश पारित झाले पाहिजेत. हायब्रीड अॅन्यूटी अंतर्गतच्या कामांना गती देण्यात यावी.अशा सूचना ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी यावेळी दिल्या.
शहरातील अंतर्गत रस्त्यांची कामे करतांना पाइपलाइन फुटणार नाही. याची दक्षता घ्यावी. अशा सूचना आमदार सुरेश भोळे यांनी केल्या.
जिल्ह्यात रस्त्यांची २८२९ कोटींची कामे मंजूर आहेत. २६४ कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. प्रलंबित कामांसाठी शासनाकडे ३५० कोटींची मागणी करण्यात आली आहे. अशी माहिती प्रशांत सोनवणे यांनी दिली.