राजकीय पक्षांमध्ये विभागणी करून घेतलेल्या, स्वयंभू माध्यमे बाळगणाऱ्या पत्रकारांच्या या युगात पत्रकारितेची व्याख्याच बदलून गेली आहे. घटना-घडामोडींची माहिती आणि त्यांचा मतितार्थ समाजाला समजावून सांगणारा पत्रकार दुर्मिळ होत चालला आहे. प्रस्थापित माध्यमांकडेही संशयाने पाहिले जात असताना पत्रकारांनी आपली विश्वासार्हता कशी जपावी, असा प्रश्न सर्वांना पडणे स्वाभाविक आहे. मात्र, अशा विपरित परिस्थितीतही प्रामाणिक, कष्टाळू पत्रकारांची मोट बांधून त्यांच्यासाठी जे काही करता येईल, ते करण्याची धडपड दाखवून देणारे मोजके पत्रकार महाराष्ट्रात दिसतात. वसंत मुंडे हे त्यांपैकी एक. बीडसारख्या उपेक्षित जिल्ह्यातून एका राज्य पातळीवरील दैनिकात पत्रकारिता करण्याची संधी मिळालेले मुंडे यांनी आधी स्थानिक पातळीवर, नंतर विभागीय आणि आता राज्य पातळीवर पत्रकारांच्या कल्याणासाठी संघटना (महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई) चालविणारे कार्यकर्ते अशी ओळख मिळविली आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत शहरे, तालुके आणि खेड्यांमध्ये राहून पत्रकारिता करीत असलेले कित्येक पत्रकार त्यांनी या चळवळीत जोडून घेतले. पत्रकारांच्या मानधनाचा प्रश्न असो, त्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न असो की निवृत्तिवेतनाचा.
मंत्रालय पातळीवर संघर्ष करून असे जटिल प्रशन सोडविण्याची धडपड ते करीत आले आहेत. कोविड साथीच्या काळात अनेक पत्रकारांना प्राण गमवावे लागले आणि त्यांचे संसार उघड्यावर आले. अशा पत्रकारांच्या कुटुंबांना शासकीय (आणि बिगरशासकीयसुद्धा) मदत मिळवून देण्यातही ते सक्रिय राहिले आहेत. म्हणूनच राज्याच्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते.
पत्रकारांच्या अनेक संघटना आहेत. त्या विभागनिहाय सक्रिय आहेत आणि त्यादेखील असे विविध प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न आपापल्या परीने करीत आहेत, मात्र त्याबरोबरच छोट्या वृत्तपत्रांचे प्रश्नही समजून घेण्याचे आणि ते सोडविण्याचे प्रयत्न करण्याचा समंजसपणा मुंडे यांनी दाखविला आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांनी राज्यभरात विभागीय पातळीवर छोट्या वृत्तपत्रांची आर्थिक घडी कशी मजबूत करता येईल, या दुर्लक्षित विषयावर परिषदा आयोजित केल्या. त्यात जाणकारांनी मांडलेल्या सूचनांचा समग्र अहवाल तयार करून तो सरकारला सादर केला. त्याचा परिणाम म्हणून जाहिरातींच्या दराची पुनर्रचना करण्यात आली.
हल्ली सर्वच वृत्तपत्रांवर कमीत कमी मनुष्यबळाच्या साह्याने अंक काढण्याची वेळ आली आहे. कोविड साथीच्या काळात प्रत्येक वृत्तपत्राचा खप घटला आहे आणि त्यामुळे निर्माण झालेली आर्थिक चणचण हे त्यामागील मुख्य कारण. खप पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न प्रत्येक वृत्तपत्र आपापल्या क्षमतेनुसार करीत आहे. उद्योग-धंद्यांनी जाहिरातींसाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांना प्राधान्य देण्याचे धोरण अवलंबिल्यामुळे छापील माध्यमांसमोर आर्थिक गणित जुळविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. शिवाय, इंटरनेटवर अवलंबून असलेल्या माध्यमांचीही गर्दी झाली आहे. अशा वातावरणात ‘सर्व्हायवल आॅफ द फिटेस्ट’ या नैसर्गिक नियमानुसार अनेक वृत्तपत्रांची छपाई बंद झाली, तर काहींना आपला व्याप कमी करावा लागला. या सर्व गोष्टींचा परिणाम पत्रकारांच्याही वेतनावर, मानधनावर, रोजगारावर झाला. जोपर्यंत वृत्तपत्रे स्वयंपूर्ण, आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाहीत, तोपर्यंत पत्रकारांना ‘अच्छे दिन’ येणार नाहीत, हे ओळखून वसंत मुंडे यांनी छोट्या वृत्तपत्रांचे महत्त्व शासनदरबारी पटवून देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अनेक शहरांमधील पत्रकारांच्या गृहनिर्माण संस्थांसाठी ते प्रयत्नशील आहेत. यासह पत्रकारांनी केवळ छापील माध्यमांवर विसंबून न राहता, आधुनिक माध्यमांकडे वळावे, इंटरनेट युगातील सर्व कौशल्ये आत्मसात करावी, यावरही ते भर देत आले आहेत. आपले काम, पत्रकारिता सांभाळून राज्यभरातील पत्रकारांच्या हितासाठी वर्षानुवर्षे सक्रिय राहणे हेदेखील एक आव्हानच आहे. ते पेलण्याची प्रेरणा त्यांना मिळत राहो आणि त्यांच्या या कार्याला यश मिळो, हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा !
– धनंजय लांबे
संपादक, दैनिक पुढरी