जळगाव,(प्रतिनिधी)- गेल्या चार पाच दिवसात राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान केलं आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत देखील यावर चर्चा होऊन तात्काळ पंचनामे करून मदत करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले असून अजून पुढील ३ दिवस राज्यात मुसळधार व मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
विदर्भातील अकरा तर खान्देशातील जळगाव, धुळे,नंदुरबार अशा तीन जिल्ह्यासहित एकूण १४ जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुढील तीन दिवस म्हणजे १ डिसेंबरपर्यंत कायम आहे. तर मुंबईसह कोकण आणि मराठवाड्यासहीत उर्वरित महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात मात्र शुक्रवार दिनांक १ डिसेंबर पर्यंत ढगाळ वातावरणासहित अगदीच तूरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यताही कायम आहे.
माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर असे ७ जिल्हे वगळता महाराष्ट्रातील उर्वरित २९ जिल्ह्यात दुपारच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा ४ डिग्रीने कमालीची घसरण जाणवत आहे. तिथे दिवसाही चांगलाच गारवा जाणवू शकतो. विशेषतः विदर्भ मराठवाड्यात हा परिणाम अधिक जाणवेल अशी शक्यता माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, शनिवार दिनांक २ डिसेंबरपासून वातावरण पूर्णपणे निवळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.