भुसावळ : भाजी विके्रत्यांसह घाऊक विक्रेते, हॉकर्स बांधवांची प्रांताधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हॉकर्स बांधवांनी नेहरू मैदानावर स्थलांतरणाला विरोध दर्शवला तर ही जागा गैरसोयीची ठरणार असल्याची भूमिका मांडत त्याऐवजी खाल्लमा दर्गा ते जामनेररोड पर्यंतच्या नाल्यावर आरसीसी स्लॅब टाकून ही जागा उपलब्ध करून दिल्यास ही जागा अधिक सोयीची राहिल, अशी भूमिका मांडली. त्यानुषंगाने पुन्हा प्रांताधिकार्यांच्या उपस्थितीत पर्यायी जागेची पाहणी केली जाणार आहे.
प्रांताधिकारी व पालिकेच्या अधिकार्यांकडून हॉकर्स झोनची जागा तसेच नेहरू मैदानावरील जागेची पाहणी केली जाणार आहे. यासोबतच शुक्रवारी हॉकर्स झोनमधील फळ विक्रेत्यांची बैठक घेण्याचे नियोजन केले जाणार आहे. प्रशासनातर्फे ही प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने आगामी काळात बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली निघणार असल्याने शहरवासीयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या बैठकीला पालिकेचे उपमुख्याधिकारी परवेज शेख, आरेखक महेश चौधरी आदींसह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
प्रांताधिकारी म्हणाले की, शहरातील नेहरू मैदानाच्या जागेवर सर्व हॉकर्स बांधवांना जागा मिळेल शिवाय प्रत्येक हातगाडीच्या मध्ये अडीच फुटाचीं जागा दिली जाईल तसेच ग्राहकांसाठी दहा फुटांचा रस्ता उपलब्ध करून दिला जाईल. या ठिकाणी सर्व हॉकर्स बांधवांना हक्काची जागा मिळू शकेल, असे मत यावेळी प्रशासक तथा प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांनी मांडले. पालिका प्रशासनाकडून पाणीपुरवठा, वीजपुरवठा, प्रसाधनगृह आदींच्या सुविधा दिल्या जातील, असेही ते म्हणाले.शहर विकासासाठी सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही प्रांतानी यावेळी दिली. यावेळी हॉकर्स युनियनचे अध्यक्ष राजू सपकाळे, राजू पाटील, गोपी शर्मा, आशिष चौधरी, आरिफ शेख आदी उपस्थित होते.
नेहरू मैदानावर पार्किंग एरीया गेल्यास बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कमी होईल, बाजारात दुचाकी वाहने आणण्यास बंदी करता येईल व त्या माध्यमातून पार्किंग झोनमधून पालिकेला उत्पन्नही मिळेल व बाजारातील कोंडीचा प्रश्नही सुटेल, असे हॉकर्सयांनी मत मांडले.