भुसावळ : आसोद्यातील शेख दाम्पत्य दुचाकी (एम.एच. 19 ए.एम.0687) ने नातीच्या लग्नासाठी रविवारी सकाळी भुसावळात आले होते व लग्न समारंभ आटोपून सायंकाळी आसोद्याकडे निघाल्यानंतर साकेगावजवळील वाघुर नदीच्या पुलावर कल्याण-न्हावी बस (एम.एच. 20 बी.एल.2739) ने जोरदार धडक देत दुचाकीला फरपटत नेले. या अपघातात शेख हे जागीच ठार झाले तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर बस चालक सचिन गोसावी पसार झाला.
नातीच्या लग्नासाठी भुसावळात आलेल्या प्रौढ दाम्पत्याचा परतीच्या प्रवासात भरधाव बसने धडक दिल्याने अपघात झाला व या अपघातात आसोद्यातील प्रौढ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू ओढवला तर पत्नी गंभीर जखमी झाली. जळगाव-भुसावळ राष्ट्रीय महामार्गावरील साकेगाव गावाजवळील वाघुर नदीवरील पूलावर हा अपघात रविवार, 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडला. अपघातानंतर दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. भुसावळ तालुका पोलिसांनी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. कुतूबुद्दीन शेख अजमुद्दीन शेख (70) असे ठार दुचाकीस्वाराचे तर बदरूनिसा कुतूबुद्दीन शेख (65, दोन्ही रा.आसोदा) असे जखमी पत्नीचे नाव आहे.
अपघातात दुचाकी बसच्या मागच्या चाकात आल्याने तिचा चुराडा झाला. जखमी झालेल्या बदरूनिसा कुतूबुद्दीन शेख यांना नजीकच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ हलविण्यात आले.