नाशिक : शनिवारी दुपारी नगर शहराजवळ एक कोटीची लाच घेतांना सहाय्यक अभियंता गायकवाड याला नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते तर गणेश वाघ कारवाईची कुणकुण लागताच कुटुंबासह पसार झाला आहे. गणेश वाघच्या शोधासाठी छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, मुंबई व पुणे येथे पथके पाठवण्यात आली आहेत. तसेच, तो राज्याबाहेर किंवा देशाबाहेर पळून जाऊ नये, यासाठी विमानतळ प्राधिकरणालाही माहिती देण्यात आल्याचे समजते.
अहमदनगर एमआयडीसी येथील तत्कालीन उपअभियंता व सध्या धुळे येथे कार्यरत असलेला कार्यकारी अभियंता गणेश वाघ व सहायक अभियंता अमित गायकवाड या दोघांनी पाईप लाईनच्या 31 कोटींच्या कामाचे थकीत 2.66 कोटींचे बिल काढण्यासाठी व बिलावर मागील तारखेच्या सह्या करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील कंत्राटदाराकडे एक कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
एक कोटी लाच प्रकरणी अटकेतील लाचखोर गायकवाड व त्याचा साथीदार गणेश वाघ यांचे बँक लॉकर सोमवार, 6 नोव्हेंबर रोजी तपासण्यात येणार आहे. रविवारी सुटी असल्याने दोघांच्याही बँक लॉकरची तपासणी झाली नाही. गायकवाड याची कोठडी संपत असल्याने सोमवार, 6 नोव्हेंबर रोजी त्याला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येईल.
एक कोटींच्या लाच प्रकरणातील सहआरोपी तथा एमआयडीसीचा तत्कालीन व हल्ली धुळ्यात अभियंता असलेल्या गणेश वाघचा राज्यभरात शोध सुरू करण्यात आला आहे. संशयित परदेशात जाण्याच्या तयारीत असल्याने त्या अनुषंगानेही नाशिक एसीबीने विमानतळ प्राधिकरणाला याबाबत माहिती दिली आहे शिवाय संशयिताच्या शोधार्थ चार पथके राज्यात रवाना झाली आहेत. संशयित गणेश वाघ याचा परीवारही घराला कुलूप लावून अज्ञातस्थळी रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.