मुंबई – परिवहन महामंडळ विभागाने दरवर्षी प्रमाणे महसूल वाढीच्या दृष्टीने परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ सूत्रानुसार केली आहे. एसटीच्या या निर्णयानुसार, या दिवाळीच्या हंगामात आपल्या सर्व बस प्रकारच्या तिकीट दरात वाढ करण्यात येणार आहे. सर्व सरकारी बस प्रकारच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
एसटीकडून ही भाडेवाढ ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजे ८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान लागू राहणार आहे. त्यानंतर मूळ तिकीट दराप्रमाणे तिकीट आकारणी सुरू होणार आहे. तसेच, ज्या एसटी प्रवाशांनी आगाऊ तिकीट आरक्षित केले आहे. त्या प्रवाशांना तिकीटाची उर्वरित फरकाची रक्कम प्रत्यक्ष प्रवास करताना वाहकाकडे भरावी लागणार आहे.
दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येत्या ९ नोव्हेंबरपासून एसटीची जादा वाहतूक करण्यात येणार आहे. सणासुदीला गर्दीचा फायदा घेत खासगी बसचालक प्रवाशांकडून ज्यादा भाडे उकळतात. यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीच्या बसेस सोडण्यात येणार आहेत.
एसटी महामंडळाकडून होळी, गणेशोत्सव, दसरा-दिवाळी या सण-उत्सवात जादा वााहतूक चालवली जाते. यामुळे एसटीला अधिक उत्पन्न मिळवण्याची संधी असते.