जळगाव,(प्रतिनिधी)- सद्या सर्वत्र गणेशोत्सव सुरु असल्याने आणि येणाऱ्या दिवस सणासुदीचे दिवस असल्याने मिठाई, पेढे व इतर गोड पदार्थांची मागणी वाढली असतांना भुसावळला १२ लाखांचा भेसळयुक्त खवा जप्तमोदक व पेढ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढल्याने मिठाईसाठी लागणारा खवा मुबलक उपलब्ध नसल्याने गुजरातमधून नकली खवा मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत असतो व पोलीस व संबंधित विभाग कारवाई देखील करत असतात त्यामुळे येणाऱ्या सणासुदीच्या काळात नागरिकांनी योग्य पारख करून मिठाई खरेदी करावी.दरम्यान आज भुसावळ येथील नहाटा चौफुलीवर नकली खवा पकडण्यात आला आहे.
सविस्तर असे की,नकली खवा भुसावळ येथे येणार असल्याची माहिती भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांना चार ते पाच दिवसांपूर्वी मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी दुपारी अकराच्या सुमारास नाहाटा चौफुलीजवळ वाहनांच्या तपासणीसाठी सापळा रचला होता. गुजरातमधून प्रवासी घेऊन आलेली लक्झरी बसमधून (जीजे 01 ईटी 1210) आयशर ट्रकमध्ये (जीजे 38 टी ए 1800) खवाच्या गोण्या आणि खोके टाकल्या जात असताना पोलिसांनी छापा टाकत तो जप्त केला.
यामध्ये एकूण 136 पोत्यांतून एकूण 5,340 किलो खवा जप्त केला. प्रत्येत पोत्यावर सहा हजार रुपये मूल्य लिहिलेले होते. या खव्याची एकूण किंमत अकरा लाख 74 हजार आठशे रुपये असून पोलिसांनी तो जप्त केला. ट्रॅव्हल्सच्या डिक्कीत व गाडीच्यावर पार्सल स्वरूपात हा खवा ठेवण्यात आलेला होता. तसेच बसमध्ये एकही प्रवासी नव्हता. याप्रकरणी पोलिसांनी बसचालक कन्नू पटेल (37, अहमदाबाद) आणि आयशर चालक सैय्यद साबीर सैय्यद शब्बीर (वय 35, अहमदाबाद) या दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी भेसळयुक्त खव्याची तपासणी करण्यासाठी तो अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात दिला आहे.
गुजरातमधील घुसाड येथून हा खवा महाराष्ट्रात आणण्यात आला होता. आयशर ट्रकमध्ये तो टाकून पुढे मुक्ताईनगरमार्गे मलकापूर, बुलढाणा, अकोला असे त्याचे वितरण करण्यात येणार होते. प्रवाशांच्या नावाखाली ही वाहतूक केली जात असल्याचे पोलिस तपासात आढळले आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी सहाय्यक आयुक्त संतोष कांबळे यांनी खव्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.

