जळगाव,(प्रतिनिधी)- आरोग्यवर्धिनी केंद्राकरिता घर भाड्याने घेऊन नियमित भाडे सुरू करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी पाचोरा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम किसन लांडे (५२) यांना सोमवारी दुपारी धुळे एसीबीने अटक केली. चाळीसगावातील शशिकला नगरातील लांडे यांच्या निवासस्थानातून सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली.याप्रकरणी डॉ. लांडे यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराने चाळीसगावातील कैलासनगरातील घर भाडेतत्त्वावर आरोग्य विभागाच्या आरोग्यवर्धिनी केंद्राकरिता देण्याबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे अर्ज केला होता. त्यासंदर्भात लांडे यांनी २२जून २०१३ रोजी ५० हजारांची लाच मागितली होती. सापळा रचल्याचा संशय आल्याने त्यांनी लाच स्वीकारली नाही. मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) लाच मागितल्याचा अहवाल आल्यानंतर लांडे यांना सोमवारी दुपारी १२ वाजता चाळीसगावातील शशिकला नगरातून अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, अपर पोलिस अधीक्षक माधव, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक रूपाली खांडवी, राजन कदम, शरद कटके, संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, गायत्री पाटील, सुधीर मोरे यांच्या पथकाने केली.