ठाणे । समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण दुर्घटना घडली असून यात पुलाचं काम सुरु इसताना गर्डर मशिन कोसळली आहे. यामध्ये आत्तापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत. आणखी सहा जण गर्डर मशिनच्या खाली अडकल्याची शक्यता आहे.दरम्यान, सध्या NDRF कडून डॉग स्कॉडच्या माध्यमातून पुलाच्या ढिगाराखाली सर्च ऑपरेशन सुरु आहे.
ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे इथं समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी ही दुर्घटना घडलीय. मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजूरांच्या अंगावर कोसळली.
यामध्ये 17 मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत सरकारने जाहीर केली आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर घटनेतील जखमींना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत देण्यात येईल, असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुण्यात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त आहे. समृद्धी महामार्गावरील क्रेन दुर्घटनेचं वृत्त समजताच त्यांनी जिल्हा प्रशासन तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून घटनेविषयी जाणून घेतले. हा अपघात अतिशय दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी करण्यासही त्यांनी सांगितले आहे.

