बुलढाणा: राज्यात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असून बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात आज सकाळपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर अनेक मार्ग बंद पडले आहेत. अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झालेलं आहे.
बुलढाणा जिल्ह्यात रात्रभर रिमझिम पाऊस बरसत होता. मात्र सकाळ झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी जळगाव जामोद तालुक्यात पावसाने रौद्ररूप धारण केलं. सकाळपासून बरसात असलेल्या मुसळधार पावसाने या परिसरातील सर्वच नदी नाल्यांना मोठे पूर आले.
तर अनेक गावात पाणी शिरल्याने नागरिकांची घरेही पाण्याखाली गेली. दरम्यान संग्रामपूर तालुक्यातील बावनविर येथील नदीला आलेल्या पुरात जवळपास 100 घरात पाणी शिरलं तर एकलारा बानोदा येथील मदन ढगे नावाचे शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेले अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.

