मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटता सूटत नाहीय. दिल्लीत मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं सांगितलं जात होतं. आज किंवा उद्याच हा विस्तार होईल असंही सांगितलं जात होतं. मात्र, आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त हुकला आहे. पावसाळी अधिवेशनानंतरच विस्तार होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे.
दरम्यान, गेल्या आठ दिवसांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार आणि नव्या मंत्र्यांच्या खाते वाटपाचा तिढा सुरु आहे. शिंदे गटाने अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास विरोध केल्याने हा तिढा अधिकच वाढला होता. खातेवाटपासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती
दिल्लीतून मंत्रिमंडळाचा विस्तार तिढा सुटल्याचं सांगितलं जात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर संभाव्या मंत्र्यांना मुंबईतच थांबण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, आता मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त हुकला आहे. पावसाळी अधिवेशनानंतरच विस्तार होणार असल्याची माहिती आहे.
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अधिवेशनात आमदारांची नाराजी नसावी आणि अधिवेशन सुखरूप पार पडावं म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे ढकलण्यात आल्याचीही चर्चा आहे. आता विस्तार अधिवेशनानंतरच केला जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या विस्ताराकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

