नागपूर : काँग्रेसमधील निलंबित नेते आशिष देशमुख यांच्या भाजप प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालं असून ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत देशमुख भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. 18 जून रोजी भाजपमध्ये घरवापसी करणार आहेत.
आशिष देशमुख यांना भाजप कुठल्या मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी देणार, अशी चर्चा नागपुरात सुरू आहे. परंतु भाजपनं देशमुख यांना पद किंवा मतदारसंघाचं आश्वासन दिलेलं नसल्याचं समजतेय. त्यांना आधी संघटनात्मक जबाबदारी दिली जाईल, असं कळतंय.
आशिष देशमुख यांच्यासह नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील हजारो कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा केला जात आहे. काही दिवसांपूर्वी आशिष देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची घरी जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर देशमुख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले होते. त्यावेळी त्यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे म्हटले होते. आज अखेर त्यांच्या प्रवेशाच्या बातमीने चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.