मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिंदे सरकार मधील शिवसेनेच्या ‘पाच’ मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून वृत्तपत्रांमधून येतं असल्याने राज्यातील राजकारण चांगलंच ढवळून निघाले होते, राज्यातील राजकारण या बातम्यामुळे चांगलेच तापले असतांना अखेर शिंदेच्या शिवसेनेने या प्रकरणावर जाहीर भूमिका मांडली असून ‘त्या’ पाच मंत्र्यांना डच्चू बाबत येणाऱ्या बातम्या तथ्यहीन असल्याचे शिवसेनेने अधिकृतरीत्या स्पष्ट केले.त्यामुळे आता शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्याला डच्चू मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मंत्र्यांचे भरभरून कौतुक…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री उशिरा शिवेसेनेचे आमदार, खासदार यांची मुंबईत बैठक घेतली. सरकार मधील सगळेच मंत्री चांगले काम करत आहेत. सहकारी मंत्र्यांचे कौतुक करून शिंदे यांनी कोणालाही वगळले जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले होते.
काय म्हणाले मंत्री शंभूराज देसाई…
शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई यांनी या बातम्या खोट्या ठरल्या तर माध्यमे माफी मागतील का, असा उलट सवाल केला. ते म्हणाले की, या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. ज्यांनी या बातम्या दिल्या त्या पत्रकारांना आमचे जाहीर आव्हान आहे की, जर या बातम्या चुकीच्या ठरल्या तर तुम्ही त्या मंत्र्यांची माफी मागणार का? शिंदे फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आमचे सरकार चांगले काम करते आहे, हे काम असेच करत राहतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.