चाळीसगाव,(प्रतिनिधी)- येथे एकाच दिवशी खुनाच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्याने तालुक्यात खळबळ उडाली. बुधवारी मध्यरात्री चिंचखेड शिवारात वृद्धाची लाकडी दांडक्याने निर्घृण हत्या करण्यात आली तर जामडी येथे गुरुवारी दुपारी तरुणाचा खून झाला.
राजेंद्र सुकदेव पाटील (५५, रा. देवळी, ता. चाळीसगाव) आणि तरबेज शहा याकूब शहा (२५, रा. जामडी, ता. चाळीसगाव) अशी खून झालेल्या इसमांची नावे आहेत. बुधवारी रात्री १० वाजता राजेंद्र पाटील हे झोपण्यासाठी शेतात गेले होते. मध्यरात्री अज्ञातांनी त्यांचा गळा दोरीने आवळून मारण्याचा प्रयत्न केला. तसेच लाकडी दांडक्याने डोक्यात वार करून ठार मारले. गुरुवारी सकाळी ७ वाजता ही घटना उघडकीस आली.
तरुण फकिराचा खून तालुक्यातील जामडी येथे गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास तरुण फकीर तरबेज शहा याकूब शहा याचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. हा तरुण एका ठिकाणी बसलेला असताना पाठीमागून एकाने त्याच्यावर सपासप वार केले. यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
दोरी व रक्ताने माखलेला लाकडी दांडा आढळून आला. याबाबत माहिती मिळताच मेहुणबारे पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण करीत आहेत. मुकेश पाटील (२३, रा. देवळी) याने याबाबत फिर्याद दिली.