जळगाव दि. ३० (प्रतिनिधी)- उत्पादन करताना उत्तम प्रतीचे बी बियाणे, उच्चकृषी तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रोक्त पद्धतीने शाश्वतशेती करून, सूक्ष्म सिंचन फर्टिगेशन तंज्ञानाचा वापर सर्वात महत्त्वाचे म्हणजे काढणी पश्चात तंत्र (फ्रुट केअर), ग्राहकांपर्यंत चांगल्या वेष्टनात फळे जाणे हे महत्त्वाचे ठरते. शेतात पिकविलेल्या शेतमालाची मूल्यवृद्धी साखळी खूप मोलाची ठरते याबाबतची महत्त्वपूर्ण चर्चा तज्ज्ञांनी केली.
जैन हिल्स येथे राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेच्या आजच्या तिसऱ्या दिवशी तज्ज्ञांनी शेतमालाच्या मूल्यवर्धनाबाबत विविध विषय तज्ज्ञांचे सादरीकरण झाले त्यात वरील संदर्भात विचार व्यक्त केले गेले. या तांत्रिक सत्र सादरीकरणाच्या अध्यक्षपदी डॉ. एच.पी. सिंग, को-चेअरमन एस. के. मलहोत्रा आणि डॉ. डी.एन. कुळकर्णी होते.
आजच्या तिसऱ्या दिवसाचे सादरीकरण सीआरआयचे डॉ. रमेश एस.व्ही. यांच्या सादरीकरणाने झाले. त्यांनी नारळाचे मूल्यवर्धन करणारे उत्पादने व शाश्वतता याबाबत आपले सादरीकरण केले. गुणवत्ता असेल तर ग्राहक हव्या त्या किंमतीला वस्तू विकत घेतात असे नमूद केले.
जैन इरिगेशनचे वरिष्ठ अधिकारी डॉ. डी.एन. कुळकर्णी यांनी फळे व भाजीपाला याविषयीचे मूल्यवर्धन व वास्तवता याबाबत सादरीकरण केले. भाजीपाला व फळांच्या उत्पादनात भारताचे असलेले स्थान व जागतिक बाजारपेठेत भारताचा अधिक वाटा वाढविण्यासाठी काय करायला हवे याबाबत सादरीकरण केले.
फळे व भाजीपाला निर्यातीत भारत का कमी पडतो याबाबतची कारणमिमांसा देखील त्यांनी केली. वैश्विक पातळीवर आणि स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना स्पर्धा करावी लागते. गुणवत्ता व किंमत हा घटक देखील भारतातून होणाऱ्या निर्यातीसाठी अत्यंत प्रभावी घटक असतो. निर्यात वृद्धीसाठी कोणती काळजी घेतली पाहिजे याबाबत डॉ. कुळकर्णी यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडणी केली.
जैन इरिगेशनचे केळीतज्ज्ञ के.बी. पाटील यांनी देखील केळी व त्याच्या मूल्यवर्धनाबाबत मोलाचे सादरीकरण केले. प्री आणि पोस्ट हार्वेस्ट मॅनेजमेंटबाबत त्यांनी प्रकाशझोत टाकला. भारतात इतर देशांच्या तुलनेने केळी लागवड क्षेत्र अधिक असून देखील केळीची नगण्य निर्यात होते याबाबतच्या मुख्य कारणांवर चर्चा केली.
इराण, यूएई, दक्षिण आफ्रिकेत भारतातून केळीची निर्यात होते ती निर्यात वाढण्याची संधी आहे याबाबतचा विश्वास के.बी. पाटील यांनी व्यक्त केला. केळीची काढणी व पॅकहाऊसमध्ये पॅकींग केल्यास आंतरराष्ट्रीय दर्जा सांभाळला जाईल. केळी हे अत्यंत संवेदनशील फळ असून त्याची फ्रुट केअर जितकी जास्त घेतली तितके अधिकचे मूल्य मिळू शकते याबाबत सांगितले.
भारतातील मसाले उत्पादन व मूल्यवर्धन याबाबत डॉ. निर्मल बाबू यांनी सादरीकरण केले. भारतात पिकणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांना जगात मोठ्या प्रमाणावर मागणी आणि भविष्यात खूप मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगत जागतिक पातळीवर भारताचा असलेला वाटा व तो वाढविण्यासाठी केले जाणारे प्रयत्न याबाबत सांगितले. आले आणि हळद या दोन्ही पिकांच्या कक्षा विस्तारलेल्या आहेत. आयुर्वेदात हळदीला अधिक महत्त्व देण्यात आलेले आहे. मसाल्याच्या पदार्थात हळदीचा अग्रभागी सहभाग आहे तो औषधी उद्योगात देखील तितकाच महत्त्वाचा ठरतो. भारताला भविष्यात या क्षेत्रात विकासाच्या कशा व किती मोठ्या प्रमाणावर संधी आहे त्याबाबत अत्यंत प्रभवीपणे त्यांनी सांगितले.
नवी दिल्ली येथील मिनिस्ट्री ऑफ अॅग्रिकल्चर अँण्ड फार्मर्स वेल्फेअरचे वरीष्ठ अधिकारी बिनोद आनंद यांनी देखील भारतातील शेती उत्पादनांची मूल्यवर्धन, मूल्यवर्धन साखळी कशा पद्धतीने कार्यरत आहे व त्यासाठी शासनाचे पाठबळ कसे मिळते याबाबत चर्चा केली. अत्यंत सहज व रंजक पद्धतीने त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले. बीएयू साबोर भागलपूर बिहार येथील डॉ.एम.फिजा अहमद यांनी आपले सादरीकरण केले. सीआयसीआरचे संचालक डॉ. एम.एस. लदानिया यांनी शेतीमाल व त्याच्या मूल्यवर्धनाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले, त्याच प्रमाणे डॉ. दिनेश कुमार, डॉ. एस.एम. जोगधन, डॉ. रश्मी कुमारी, डॉ. नवीन कुमार यांनी देखील तांत्रिक सादरीकरण केले.
या तांत्रिक सत्राचे अध्यक्ष डॉ. एच.पी. सिंग यांनी अध्यक्षिय मनोगत व्यक्त केले. शेतकऱ्यांनी उत्तम गुणवत्तेचे बी-बियाणे, अत्याधुनिक सिंचन पद्धती त्याच्या जोडीला फर्टिगेशन आणि काढणी पश्चात उत्तम तंत्रज्ञान अवलंबले तर शेतमालाचे शाश्वत मूल्यवर्धन शंभर टक्के होईल यात शंका नाही असा विश्वास व्यक्त केला. त्यासाठी जैन इरिगेशनच्या टिश्युकल्चर रोपांचे उदाहरण त्यांनी दिले.
शेतकऱ्यांनी टिश्युकल्चर केळीची रोपे वापरली तर त्यांच्या केळी उत्पादनात दुप्पट वाढ झालीच शिवाय गुणवत्तापूर्ण फळे मिळू लागली. घड व्यवस्थापनासाठी एका घडाला कमीत कमी सत्तर ते पंच्याहत्तर पैसे स्कर्टिंग बॅगसाठी लागतात. ती लावली तर किलोमागे कमीतकमी ३ रुपये अधिक किंमत अशा गुणवत्तापूर्ण केळीला मिळते त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरायला हवी व नव्या तंत्रज्ञानानुसार शेती करायला हवी असे सांगितले.