जळगाव : जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक अनेकांच्या जीवावर उठलेले आहे. अनेकांना जीव गमवावा लागला असून तरी सुद्धा यावर वाळू तस्करांना आळा नेमका केव्हा बसणार? याबाबत प्रश्न उपस्थति होत आहे. अशातच भरधाव वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाने शिंदे गटाचे आमदार लता सोनवणे यांच्या कारला जोरदार धडक दिली. यामध्ये आमदार लता सोनवणे यांच्यासह त्यांचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे तसेच चालक, अंगरक्षकलाही किरकोळ दुखावत झाली. सुदैवाने या अपघातात आमदार सोनवणे या बालंबाल बचावल्या आहेत.
ही घटना जळगाव तालुक्यातील करंज-धानोरा दरम्यान झाला. आमदार लता सोनवणे या त्यांचे पती तथा माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्यासोबत सायंकाळी आपल्या चारचाकी वाहनाने चोपड्याकडून जळगाव कडे येत होत्या. जळगाव तालुक्यातील करंज गावाजवळ जळगाव कडून चोपड्याकडे जाणाऱ्या भरधाव डंपरने आमदार लता सोनवणे यांच्या इनोव्हा गाडी (एमएच- १९, बीयू- ९९९)ला जबर धडक दिली.
ही धडक इतकी जबर होती की, या धडकेत आमदार सोनवणे यांच्या चारचाकीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. या घटनेनंतर पोलिसांनी आमदार लता सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या अपघातानंतर वाळूच्या डंपर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.