जळगाव,(प्रतिनिधी)- तृतीयपंथीयांना वेगळा न्याय नको म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांना देखील समाविष्ट करून घ्यावे असा निर्णय दिलेला असतांना जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यामधील तृतीयपंथी चँदने या संधीचं सोनं केलं. पोलीस भरतीमध्ये धुळे येथे जाऊन मैदान मारणारी चाॅंद ही राज्यातील प्रथम तृतीयपंथी पोलीस होणार आहे. तीन भावंडांची जबाबदारी चाॅंदचा जन्म भुसावळ येथे झाला. आजी व आई अचानक वारल्यामुळे तीनही भावंडांची जबाबदारी तिच्यावर आली.
रेल्वे स्टेशनवर व धावत्या गाडीत जोगवा मागून उदरनिर्वाह करणाऱ्या चाॅंदच्या जीवनात उच्च न्यायालयाच्या या एका निर्णयाने रंग भरला गेला. तिने रोज सकाळी रेल्वे मैदानावर धावण्याचा सराव सुरू केला. सोबतच क्लास लावून सामान्य ज्ञान, गणित व ग्रामरचे शिक्षण घेतले. चाॅंद हिने जिद्दीच्या जोरावर धुळे येथे पोलीस मैदानावर परीक्षा दिली व त्यात ती अव्वल आली.
लहानपणीच यल्लमा मातेला सोडलं भुसावळच्या किन्नर मठात राहणारी व यल्लमा मातेला सोडलेली किन्नर चाॅंद ही आता लवकरच राज्याच्या पोलीस दलात दाखल होणार आहे. पोलिसात दाखल होणारी चाॅंद ही राज्यातील पहिली तृतीयपंथी ठरणार आहे. इतर तृतीयपंथीयांनी देखील या संधीचं सोनं करावं. उच्च शिक्षण घेऊन पोलीस दल किंवा इतर प्रशासकीय सेवेमध्ये रूजू व्हाव असा संदेश यावेळी चॉंद उर्फ बेबो तडवी हिने दिला आहे.