influenza virus information
इन्फ्लुएन्झा influenza virus H3 N2 या विषाणूंनं डोकं वर काढलं असून इन्फ्लुएंझा (H3N2)ची लागण झालेले रुग्ण महाराष्ट्रातही आढळून येत आहेत. तथापि सकस आहार, पुरेशी झोप, गर्दीत जाणे टाळणे, मास्कचा वापर त्याचबरोबर आजाराची लक्षणे आढळून आल्यावर वेळीच उपचार घेतल्यास इन्फ्लुएन्झा आजारातून लवकर बरे होता येते. म्हणूनच इन्फ्लुएन्झा आजाराला ‘घाबरु नका..पण खबरदारी घ्या..!’, असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी केले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. योगेश साळे यांनी माहिती अधिकारी वृषाली पाटील यांच्याशी साधलेला हा संवाद…
influenza virus symptoms in marathi
इन्फ्लुएन्झा आजार आणि त्याची लक्षणे- इन्फ्ल्यूएंझा आजार विषाणुमुळे होणारा आजार आहे. इन्फ्ल्यूएंझाचे टाईप A B आणि C असे प्रकार आहेत. इन्फ्ल्यूएंझा टाईप ए चे उपप्रकार H1 N1, H2N2,H3 N2 असे आहेत. यात ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे, न्युमोनिया अशी लक्षणे आढळतात. यावर प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. सर्दी, ताप, खोकला होताच जवळच्या सरकारी किंवा खाजगी दवाखान्यात त्वरित तपासणी करुन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यावेत.
इन्फ्ल्यूएंझा होऊ नये म्हणून घ्यावयाची खबरदारी – सर्वांनी वारंवार साबण आणि स्वच्छ पाण्याने हात धुवावेत. पुरेशी झोप आणि विश्रांती घ्यावी तसेच भरपूर पाणी प्यावे. खोकला असल्यास मास्क किंवा तीन पदर करुन हातरुमाल वापरावा. आजारी व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. ही काळजी घेवून देखील या आजाराची लक्षणे आढळून आलीच तर रुग्णांनी वेळीच उपचार सुरु करावेत, जेणेकरुन हा आजार लवकरात लवकर बरा होण्यास मदत होईल.
आरोग्य विभागाच्या वतीने तयारी- आरोग्य विभागाच्या वतीने पुरेसा औषधसाठा व वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. कोविड 19, इन्फ्ल्यूएंझा बाबतीत नियमित रुग्ण सर्वेक्षण, सहवासितांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच विविध माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. रुग्णाच्या सहवासात आल्यापासून दहा दिवसात फ्ल्यू सारखी काही लक्षणे आढळल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा. सर्दी, खोकला अंगावर काढु नका. त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने सुरु केलेल्या उपचारासोबतच गरम पाण्याची वाफ घ्यावी, आदी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.
influenza treatment
इन्फ्ल्यूएंझा टाळण्याकरता आवश्यक बाबी- हस्तांदोलन टाळावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषध घेऊ नये. लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. विशेषत: वृध्द व दुर्धर आजारी लोकां#नी गर्दीत जाणे टाळावे.
इन्फ्ल्यूएंझाची व सहव्याधीग्रस्त रुग्णांची काळजी- बहुतांश इन्फ्ल्यूएंझा रुग्ण सौम्य स्वरुपाचे असतात. त्यांना रुग्णालयात भरती करण्याची आवश्यकता भासत नाही. अशावेळी इन्फ्ल्यूएंझा रुग्णांची घरच्या घरी देखील काळजी घेणे गरजेचे आहे. रुग्णाकरिता वेगळी खोली निश्चित करावी. रुग्णाने शक्यतो कुटूंबियांशी संपर्क टाळावा. रुग्णाने नाकावर साधा रुमाल बांधावा. रुग्णाची सेवा शक्यतो कुटूंबातील एकाच व्यक्तीने करावी. रुग्णाने घरात जर कोणी अतिजोखमीचे आजार (कोमॉर्बिडीटी) असणारे व्यक्ती असतील तर त्यांच्या निकट सहवासात जाऊ नये. घरात ब्लिच द्रावण तयार करावे. याचा उपयोग रुग्णाचा टेबल, खुर्ची, रुग्णाचा स्पर्श होतील असे पृष्ठभाग पुसण्यासाठी करावा. रुग्णाने वापरलेले टिश्यू पेपर अथवा मास्क इतस्ततः टाकू नयेत. रुग्णाने वापरलेले रुमाल गरम पाण्यात ब्लिच द्रावणात अर्धा तास भिजवून नंतर स्वच्छ धुवावेत. रुग्णाचे अंथरूण, पांघरुण, टॉवेल हाताळल्यास हात साबण व पाण्याने स्वच्छ धुवावेत. भरपूर विश्रांती घ्यावी. द्रव पदार्थ घ्यावेत. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. दिवसातून किमान दोन वेळा गरम पाण्यात मीठ हळद टाकून गुळण्या कराव्यात. तसेच गरम पाण्यात निलगिरी तेल टाकून त्याची वाफ घ्यावी. ताप आणि इन्फ्ल्यूएंझाची इतर लक्षणे मावळल्यानंतर किमान २४ तासापर्यंत घरी रहावे. धाप लागणे, श्वास घेताना छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, ताप न उतरणे अशी लक्षणे आढळल्यास तसेच लहान मुलांमध्ये चिडचिड करणे, खाण्यास नकार, उलट्या अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखविणे आवश्यक आहे.
अतिजोखमीच्या व्यक्तींनी घ्यावयाची काळजी- इन्फल्यूएंझा ए एच१एन१ आजार खालील अतिजोखमीच्या व्यक्तींमध्ये गंभीर स्वरुप धारण करु शकतो- पाच वर्षाखालील मुले (विशेष करून १ वर्षाखालील बालके), ६५ वर्षावरील वरिष्ठ नागरिक, गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा इतर हृदयरोग, मधुमेह, स्थूलत्व, फुप्फुस, यकृत, मुत्रपिंड यांचे आजार असणाऱ्या व्यक्ती चेतासंस्थेचे विकार असणाऱ्या व्यक्ती प्रतिकार शक्तीचा ऱ्हास झालेली व्यक्ती दीर्घकाळ स्टिरॉईड औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी काळजी घ्यावी.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहार- रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्यास कोणताही आजार उद्भवण्याचा धोका कमी राहतो. यासाठी आपण सर्वांनी नेहमी पौष्टिक आहार घ्यायला हवा. आहारात लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या यासारख्या आरोग्यदायी पदार्थांचा वापर करावा. त्याचबरोबर नाचणीसारख्या पौष्टिक तृणधान्यांचा आहारात आवर्जुन समावेश करावा. प्रक्रिया केलेले तसेच बेकरी पदार्थ, फास्टफूड खाणे टाळावे.
influenza treatment at home
शब्दांकन :
वृषाली पाटील
माहिती अधिकारी,
जिल्हा माहिती कार्यालय,
कोल्हापूर