मुंबई : राज्यात भाजप-शिवसेनेचं सरकार असताना विरोधी पक्षातील नेत्यांच्या फोन टॅपिंगचा आरोप करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माहिती दिली आहे.
ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकारी आणि नेत्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना करण्यात आल्याच्या बातमीमुळे राज्यात चर्चांना उधाण आले आहे. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या या सूचनांमुळे ठाकरे गटाचा फक्त आयफोनवरच विश्वास उरला आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटाला राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून फोन टॅपिंगची भिती वाटत असावी किंवा खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन पक्षाकडून करण्यात आल्याचे शिवसेनेच्या काही नेत्यांकडून सांगितले जात आहे. मात्र शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी पक्षाकडून आशा कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत नाहीत असे स्पष्ट केले आहे.
अंबादास दानवे यांनी पुढे बोलताना सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत ते गरजेचे आहे. व्हिडीओ क्लिप, ऑडिओ क्लिप व्हायरल होत असतात. त्यामुळे सुरक्षतेसाठी प्रमुख लोकांनी आयफोन वापरला पाहिजे अशा सूचना मी जिल्ह्यामध्ये दिल्या आहेत. पण पक्षाकडून अशा कोणत्याही सूचना देण्यात आल्या नाहीत.

