पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील दौंड तालुक्यातील पारगावमधील भीमा नदीत एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नदी पात्रात मिळालेले सर्व मृतदेह हे एकाच कुटुंबातील असून यामध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहन उत्तर पवार (वय, ५०) आणि संगीता मोहन पवार (वय, ४५) त्यांची मुलगी राणी शामराव फुलवरे (वय, २७ वर्ष) जावई शामराव पंडित फुलवरे आणि नातू मुले रितेश फुलवरे (वय,७ वर्ष), छोटू फुलवरे (वय, ५ वर्ष) आणि कृष्णा फुलवरे (वय, ३ वर्ष) यांचे मृतदेह भीमा नदीपात्रात आढळून आले आहेत.
दरम्यान, नदीपात्रात सापडलेले या सात मृतदेहांमुळे पोलीस चक्रावले होते. ही हत्या असल्याचा संशयावरुन तपास सुरु केला होता. मोहन पवार त्यांच्या कुटुंबातील सात जणांचे मृतदेह होते. परंतु ही हत्या नाही तर आत्महत्या असल्याचे स्पष्ट झाले.
मुलाने केला घोळ अन् संपले कुटुंब
मुळचे बीड व उस्मानाबाद असणारी पवार कुटुंब भटकंती करत व्यवसाय करत होते. सध्या ते निघोजमध्ये राहात होते.ह्रदय पिळवटून लावणारी ही घटना मोहन पवार यांचा मुलगा अमोलमुळे घडली. त्याने नात्यातील विवाहित मुलगी पळवून आणली. या बाब मोहन पवार व त्यांच्या कुटुंबियांना मान्य नव्हती. मुलीला परत पाठवून दे, असे ते सातत्याने सांगत होते. मुलीला परत न पाठवल्यास आम्ही आत्महत्या करु, असेही त्यांनी अमोलला सांगितले होते. अमोलने वडिलांचे म्हणणे ऐकले नाही, यामुळे निराश झालेल्या पवार व जावाई फुलवरे यांच्या कुटुंबातील सात जणांनी आपले जीवन संपवले.
भीमा नदीच्या पात्रात 18 जानेवारी रोजी एका महिलेचा, 20 जानेवारी रोजी पुरुषाचा, 21 जानेवारी रोजी महिलेचा, 22 जानेवारी रोजी पुन्हा एक महिलेचा आणि 24 जानेवारी रोजी तीन लहान मुलांचे असे टप्प्याटप्प्याने सात मृतदेह आढळले.

