मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतुर्त्वाखाली नवीन सरकार स्थापन झालं आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळाच्या खातेवाटपबाबत सर्वांना उत्सुकता लागून राहिलेली आहे. अशातच येत्या काही दिवसांत होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपात सर्वात महत्त्वाची खाती भाजपकडे राहील, अशी शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अर्थ, महसूल आणि गृहखाते हे भाजपकडे राहील. तर एकनाथ शिंदे गटाला नगरविकास आणि MSRDC (रस्ते विकास महामंडळ) खाती मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारमध्ये ही दोन्ही खाती एकनाथ शिंदे यांच्याकडेही होती. मात्र, या दोन्ही खात्यांच्या कारभारात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून हस्तक्षेप होत असल्याने एकनाथ शिंदे नाराज होते. त्यामुळे आता भाजपसोबत सरकार चालवताना तरी एकनाथ शिंदे यांच्याकडे या दोन्ही खात्यांचे संपूर्ण नियंत्रण असेल का, हे पाहावे लागेल.
याशिवाय, एकनाथ शिंदे गटासोबत असणाऱ्या ३९ आमदारांपैकी कोणाला मंत्रिपदं मिळणार, याचीही उत्सुकता सर्वांना लागली आहे. ठाकरे सरकारमधील तब्बल ८ मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले होते. त्यामुळे या सगळ्यांना आपापली खाती परत मिळणार का, हे पाहावे लागेल. अर्थ, महसूल आणि गृह ही तिन्ही प्रमुख खाती भाजपकडे गेल्यास एकनाथ शिंदे गटाच्या वाट्यास काय येणार, हेदेखील पाहावे लागेल.
हे पण वाचा :
सई ताम्हणकरचा नवं फोटोशूट ; पाहून चाहते झाले घायाळ
‘ही’ सरकारी बँक १ ऑगस्टपासून चेक नियमात करणार बदल ; जाणून घ्या नाहीतर करू शकणार नाही व्यवहार
भारतीय नौदलमध्ये तब्बल 2800 पदांसाठी मेगा भरती ; 40000 पगार मिळेल
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चेनुसार, एकनाथ शिंदे गटातील बहुतांश आमदारांना राज्यमंत्री पद आणि महामंडळे देऊन त्यांची योग्य ती सोय करण्यात येईल. एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी शिवसेना सोडून मोठा राजकीय धोका पत्कारला आहे. त्यामुळे आपल्याला याचा योग्य तो मोबदला मिळावा, अशी या सर्व आमदारांची अपेक्षा आहे. तेव्हा आता प्रत्यक्षात या आमदारांच्या पदरी कोणती खाती पडणार, हे येत्या काही दिवसांमध्येच स्पष्ट होईल.