जशपूर : माणुसकीला काळीमा फासणारी आणि नात्याला कलंक लावणारी घटना छत्तीसगडमधील जशपूरमध्ये समोर आली आहे. नऊ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला आहे. या संतापजनक घटनेतील मुख्य आरोपी या मुलीचा बापच आहे. दारूच्या नशेत त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी तिघांना अटक केली असून याप्रकरणाचा तपास सुरू आहे.
जशपूरच्या नारायणपूर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात हा आरोपी आपल्या तीन मुलांसह आणि वृद्ध आई-वडिलांसोबत राहत होता. आरोपीच्या पत्नीचा मृत्यू 2019 मध्ये झालेला आहे. 28 एप्रिलला रात्री दारुच्या नशेत आरोपी त्याच्या दोन मित्रांसह आपल्या घरी आला. यावेळी त्याची तिन्ही मुलं (एक 3 वर्षांचा, तर दुसरा 6 वर्षांचा मुलगा आणि 9 वर्षांची मुलगी) झोपले होते. आरोपीने यावेळी आपल्या 9 वर्षाच्या मुलीला झोपेतून उठवले आणि तिला दुसऱ्या रुममध्ये घेऊन गेला. यानंतर त्याने आपल्या मित्रांसोबत आपल्याच स्वत:च्याच पोटच्या मुलीसोबत सामूहिक दुष्कृत्य केलं.
पीडित मुलीने आपल्या लहान भावांना तसेच इतर तिच्या नात्यातील आजीला याबाबत सांगितले. पीडित मुलगी जवळच्या गावात असलेल्या आपल्या आजीकडे तिसरी वर्गात शिक्षण घेत होती. तिने आपल्या आजीला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर तिच्या आजीने नारायणपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पीडिताच्या आजीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी बाप आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात 376 (घ) 376 (क,ख) पॉस्को कायदा 4,6,17 अंतर्गत गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.