पुणे : मूल होत नसल्याच्या कारणातून तरुणाने आपल्या पत्नीसोबत क्रूरतेचा कळस गाठला आहे. नराधम आरोपीनं पीडित महिलेचा गळा आवळून तिची निर्घृण हत्या केली आहे. ही घटना पुण्यानजीक (Pune) असणाऱ्या आंबेगाव बुद्रुक परिसरात उघडकीस आली आहे.
हत्येची ही थरारक घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
काजल देवानंद काळेल असं हत्या झालेल्या 24 वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे. तर देवानंद काळेल असं अटक केलेल्या 30 वर्षीय आरोपी पतीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत काजल आणि आरोपी पती देवानंद हे दोघंही पुण्यानजीक असणाऱ्या आंबेगाव बुद्रुक परिसरातील वेताळनगर येथे वास्तव्याला होते. अलीकडेच काही वर्षांपूर्वी त्यांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर काही दिवस दोघांनी सुखी संसार केला.
पण लग्नांनतर पत्नीला मूल होत नसल्याने पतीने तिचा छळ करायला सुरुवात केली. मागील बऱ्याच दिवसांपासून पती मूल होत नसल्याच्या कारणातून पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. अखेर मूल होत नसल्याच्या कारणातून आरोपी पतीनं तिचा गळा घोटला आहे. या घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर आरोपीला तातडीनं अटक केली. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. केवळ मूल होत नसल्याच्या कारणातून पत्नीची निर्घृण हत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.