पुणे : मुलींसह महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवसव वाढतच चालले आहे. अशातच पुण्यात नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील ताडीवाला रोड परिसरातील एका 11 वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत तिच्या वडिलांनं, अल्पवयीन भावाने, आजोबा आणि चुलत मामाने अमानुषतेचा कळस गाठला आहे. नराधम आरोपींनी वेळोवेळी धमकी देत पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे.
कोरेगाव पार्क येथील एका इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये केलेल्या समुपदेशनातून हा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीनं समुपदेशन करणाऱ्या महिलेला तिच्यावर झालेल्या अत्याचाराची आपबिती सांगितली आहे.
यानंतर समुपदेशन करणाऱ्या महिलेनं बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पीडित मुलीच्या मते, 2017 साली ती बिहारमध्ये असताना तिच्या वडीलांनी घरात कोणीही नसताना तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर नोव्हेबर 2020 मध्ये ताडीवाला रोड येथे वास्तव्याला असताना पीडितेच्या 14 वर्षीय भावानं तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले. आरोपीनं पीडितेला धमकी देत अनेकदा अत्याचार केले आहेत.
एवढंच नव्हे तर, जानेवारी 2021 मध्ये तिच्या आजोबांनी तर मे 2021 मध्ये तिच्या चुलत मामाने तिच्याशी अतिप्रसंग केला आहे. याबाबत बंडगार्डन पोलिसांनी चारही आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे करत आहेत.