चाळीसगाव : पत्नीने मद्यपान केल्याच्या कारणावरून पतीने कुऱ्हाडीने वार करत निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील मेहूणबारे परिसरात घडली. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून याबाबत आरोपी पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
कुवरसिंग चत्तरसिंग पावरा (रा. मोहरतमाळ, राज्य मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव असून निनुबाई कुवरसिंग पावरा असे मृत झालेल्या विवाहितेचा नाव आहे. हे दाम्पत्य सालाने काम करण्यासाठी मार्च- २०२१ मध्ये तालुक्यातील मेहूणबारे शिवारात एकाच्या शेतात कामासाठी आले आहेत. आणि त्याचठिकाणी एका शेडमध्ये वास्तव्यास आहेत.
दरम्यान कुवरसिंग चत्तरसिंग पावरा यांनी आपल्या पत्नीला तु मद्यपान का केले आहे. असे विचारून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर वाद विकोपाला गेल्यावर घरात पडलेली कुऱ्हाड डोक्यात घालून पत्नीची निघृणपणे हत्या केली. हि धक्कादायक घटना १८ मार्च रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी पतीला मेहूणबारे पोलिसांनी ताब्यात घेतले असून ज्ञानेश्वर माळी यांच्या फिर्यादीवरून मेहूणबारे परिसरात भादवी कलम- ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सपोनि विष्णू आव्हाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहेत.