बदलापूर : धुलीवंदनाचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना, बदलापूरमध्ये दुर्दैवी घटना घडली. धुलीवंदन सणाचा आनंद लुटून घरी आलेल्या एका तरुणाचा अचानक दुर्देवी मृत्यू झाला. आशुतोश संसारे (वय 27) असे या दुर्देवी तरुणाचे नाव आहे. आशुतोषच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबत असे की, बदलापूरच्या हेंद्रपाडा परिसरात शुभदान ही सोसायटी आहे. या ठिकाणी होळीनिमित्त कार्यक्रम होता. स्पीकरवर गाणी लावून सगळे नाचत होते. आशुतोष देखील नाचत होता. नाचून झाल्यावर तो घरी गेला आणि थोड्याच वेळात त्याच्या छातीत दुखायला लागले. त्याच्या पत्नीने शेजाऱ्यांना याची माहिती दिली.
त्यांच्या मदतीने आशुतोषला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला. एका वर्षापूर्वीच आशुतोषचे लग्न झाले होते. आशुतोषच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे बदलापूर पोलिसांनी सांगितले. होळीच्या दिवशी बदलापूर शहरात एक आत्महत्या आणि एक मृत्यू अशा दोन घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.