जळगाव दि. १३ : लाईफ इज ब्युटीफुल फाउंडेशन आयोजित, मल्हार हेल्प फेअर -४ चे काल सायंकाळी ६ वा. भव्य उद्घाटन सोहळा पालकमंत्री श्री. गुलाबराव पाटिल यांच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, आमदार राजूमामा भोळे, नयनतारा बाफना, अमोल चिमणराव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावर्षी हेल्प फेअर मध्ये एकूण ६० समाजसेवी संस्था व २६ सेवामहर्षी सहभागी झाले आहेत. स्वयंसेवी संस्थांच्या प्रदर्शनासोबतच यावर्षी शासकीय योजनांची, रोजगार मेळावा, खान्देशी खाद्य जत्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि हॉबी डूबी डू हा विभाग तसेच विविध क्षेत्रातील सेवादूतांचा सत्कारही या सोहळ्यात सामाविष्ट करण्यात आले आहे. सेवाभावी संस्थांचे मनोबल वाढविणे, त्यांच्या कार्याचा गौरव करणे, त्यांना मदतीचा हात देणे यासोबतच समाजाला समाजऋण फेडण्याचे नवनवे मार्ग दाखविणे, विद्यार्थ्यांमध्ये सेवाभाव, दातृत्व जगविणे, तरुण पिढीला सेवाकार्यात करियरच्या नवीन वाटा दाखविणे हि या आयोजनाची प्रमुख उद्दिष्टे आहेत. प्रामुख्याने याच हेतूने या सोहळ्याची मांडणी करण्यात आलेली आहे.
अनोख्या सोहळ्याची अनोखी सुरूवात
कार्यक्रमाच्या पहिल्या उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यावर सर्व उपस्थित मान्यवरांनी सेवाभावी संस्थांच्या स्टॉल्सला भेट दिली व त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला. मानवतेची मंदिरे या विचारावर आधारित हेल्प-फेअर-४ मध्ये आलेल्या मान्यवरांचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आले. एखाद्या मंदिरात प्रवेश करावा यारीतीने घंटानाद करून त्यांना मंचावर बोलवण्यात आले, त्याचवेळी एलईडी स्क्रीनवर ज्येष्ठ सेवामूर्तींना देवाच्या स्वरूपात दाखवून एक अनोखा संदेश यावेळी देण्यात आला. यानंतर मंचावर स्थानबद्ध झाल्यावर सर्वांना हेल्प-फेअरचा परिचय देणारी फिल्म दाखवण्यात आली. केशवस्मृती प्रतिष्ठानचे भरत अमळकर यांनी प्रस्तावना केली तर शुभदा नेवे यांनी सूत्रसंचालन केले.
मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केल्यावर सेवामहर्षी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला ज्यात एकूण ९ सेवाव्रतींना सन्मानित करण्यात आले. एकीकडे सांस्कृतिक कार्यक्रम सुरु होते तर दुसरीकडे खाद्यजत्रेचा आनंद जळगावकर लुटत होते. आलेल्या पाहुण्यांचा उत्साह पाहता हेल्प-फेअरला खरोखरच एका जत्रेचे स्वरूप मिळाले होते. ३ दिवस चालणाऱ्या या सोहळ्याला जास्तीत जास्त नागरिकांनी हजेरी लावून एका वेगळ्या आनंदाची अनुभूती घ्यावी, असे हेल्प फेअरचे सदस्य आनंद मल्हारा यांच्यातर्फे आवाहन करण्यात आले आहे.
हेल्प फेअर म्हणजे सेवेकऱ्यांची जत्रा – कांचनताई परुळेलकर
हेल्प-फेअरच्या प्रथम दिवशी प्रमुख वक्ते म्हणून कोल्हापूर येथील स्वयंसिद्धा संस्थेच्या कांचनताई परूळेकर यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी संवाद साधतांना त्यांनी कोरोनामुळे हतबल झालेल्या सामाजिक संस्थांची व्यथा मांडली आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी हेल्प फेअर हे कशाप्रकारे एक प्रभावी माध्यम ठरू शकते याबद्दल त्या बोलल्या. कोरोना नंतरच्या परिस्थितीत सेवाभावी संस्था आणि गरजू, दानशूरांना एकत्र आणणारी ही आगळीवेगळी संकल्पना खरोखरच गरजेची आहे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
आज होणार रोजगार मेळावा व कार्यशाळेचे आयोजन
हेल्प-फेअर मध्ये यंदा प्रथमच रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भारत सरकारच्या कमवा आणि शिकवा या अभियाना अंतर्गत नॅशनल एम्प्लॉयबिलिटी एन्हान्स मिशन (निम) योजनेंतर्गत १२ वी विज्ञान किंवा आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी हा रोजगार मेळावा आयोजित केला आहे. इच्छुक उमेदवारांनी आज दुपारी १ ते ४ दरम्यान सागर पार्क मैदानावर आयोजित हेल्प फेअरला भेट द्यावी असे कळविण्यात आले आहे. याव्यतिरिक्त स्वयंसेवी संस्थांची सामाजिक उद्योजकता या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे ज्यामध्ये कोल्हापूर येथील स्वयंसिद्धा संस्थेच्या कांचनताई परूळेकर हे सामाजिक संस्थांना मार्गदर्शन करतील. वरील कार्यशाळा हॉटेल कोझी कॉटेज येथे सकाळी १० ते १ या दरम्यान होणार आहे.