मुंबई | राणे कुटुंबीयांच्या अडचणीत आणखी एक भर पडली आहे. भाजपचे आमदार नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव दाऊद इब्राहीमशी जोडून त्यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी नितेश आणि निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल केलाय.
संतोष परब हल्लाप्रकरणात नितेश राणे यांना झालेली अटक, अधीश बंगल्यावरील कारवाईची टांगती तलवार आणि त्यानंतर आता नव्याने दाखल झालेल्या या गुन्ह्यामुळे राणे कुटुंबीयांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. निलेश राणे यांनी नुकतीच आपल्या नेहमीच्या शैलीत शरद पवार यांच्यावर टीका केली होती.
यामध्ये त्यांनी शरद पवार यांचे नाव कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी जोडले होते. तर नितेश राणे यांची आझाद मैदानातील मोर्चादरम्यान शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांची जीभ घसरली होती. याच कारणावरून मरिनड्राईव्ह पोलिसात नितेश आणि निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे समजते. याप्रकरणात आता पोलीस या दोघांनाही चौकशीसाठी बोलावणार किंवा पुढे काय कारवाई करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.