धरणगाव : राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट देशी दारूची निर्मिती करणार्या कारखान्यावर छापा टाकण्यात आल्याची घटना धरणगाव येथे घडलीय. यात ११ लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे. तर चार जणांना अटक करण्यात आली आहे दरम्यान, या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.
धरणगाव येथे बनावट मद्यनिर्मिती होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. यानुसार पथकाने भास्कर पांडुरंग मराठे याचे राहते घर, साई गजानन पार्क, धरणगाव, ता. धरणगाव येथे छापा टाकला. यात या ठिकाणी बनावट देशी मदय तयार करण्याकरीता लागणारे साहीत्य स्पीरीट, बनावट देशी दारु टँगो पंचच्या १८० मिली च्या सिलबंद बाटल्याचे ११७ बॉक्स(५६१६ बाटल्या), बनावट देशी दारु टँगो पंचच्या ९० मिली च्या सिलबंद वाटल्यांचे ८६ बॉक्स (८६०० बाटल्या), देशी दारूचा तयार ब्लेंड, ४ सिलींग मशिन, १ ब्लेंडिंग मशिन, बुचे, रिकाम्या बाटल्या, खोके, कागदी लेबल तसेच दोन दुचाकी असा एकुण रु. ११ लाख २ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीसाठी गौतम नरेंद्र माळी, वय ३२ वर्षे, रा. थवा, ता. नेत्रंग, जि, भरुच, (गुजरात) ह.मु. साईगजानन पार्क,धरणगाव; भुपेंद्र गोकुळ पाटील, वय २९ वर्षे, रा. मराठे गल्ली, धरणगाव; कडु राजाराम मराठे, वय ४० वर्षे, , रा. मराठे गल्ली, धरणगाव; आणि भास्कर पांडुरंग मराठे, वय ६३ वर्षे, रा. साई गजानन पार्क, धरणगाव यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. या सर्वांच्या विरूध्द गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.