पुणे : राज्यात अत्याचाऱ्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पिंपरी चिंचवड परिसरातील म्हाळुंगे याठिकाणी हि घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे नराधमाने पीडित मुलीचा ओरडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये, म्हणून टीव्हीचा आवाज वाढवून चिमुकलीवर बलात्कार केला आहे. पीडित मुलीनं आपल्या घरी आल्यानंतर आई वडिलांना हा प्रकार सांगितला आहे. या प्रकरणी पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (POCSO) अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला असून योगेश साहेबराव चाटी असं अटक केलेल्या नराधम आरोपीचं नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश याची पत्नी कामावर गेली होती. यावेळी आरोपीनं घरी भाजी बनवायची असल्याचं सांगून पीडितेला आपल्या घरी बोलावलं होतं. यावेळी पीडितेला एकटं पाहून आरोपीनं तिच्यासोबत क्रूरतेचा कळस गाठला आहे. त्याने पीडित मुलीचा ओरडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून घरातील टीव्हीचा आवाज वाढवून तिच्यावर बळजबरी अत्याचार केला आहे. पीडित मुलगी गरीब घरातील आहे. संबंधित घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे.
अत्याचार झाल्यानंतर भेदरलेल्या पीडित मुलीनं घडलेला सर्व प्रकार आपल्या आई वडिलांना सांगितला आहे. ओळखीच्याच व्यक्तीनं अशाप्रकारचं कृत्य केल्यानं आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने म्हाळुंगे पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पोक्सोसह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अल्पवयीन मुलीवर बलत्कार झाल्याची घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास म्हाळुंगे पोलीस करत आहेत.