बुलढाणा : पुणे आणि सातारा येथे लहान मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर आता असाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यात घडला आहे. संग्रामपूर तालुक्यातील एका गावात 8 वर्षीय बालकावर 25 वर्षीय तरुणाने अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे.
8 वर्षीय मुलगा झाडाखाली खेळत असताना त्याला 25 वर्षीय तरुणाने आपल्या घरात बोलावले आणि मग त्याच्यासोबत अनैसर्गिक अत्याचार केला. पैशाचे आमिष दाखवून आरोपी रवींद्र उर्फ विक्की नाना ठाकरे या नराधमाने एका 8 वर्षीय बालकावर अनैतिक कृत्य केलं. या कृत्यानंतर त्या बालकाला 100 रुपये देऊन घडलेल्या घटनेसंदर्भात कुणाला सांगू नको अशी तंबी दिली. पण या मुलाने धमकीला न घाबरता घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलाच्याआईने तामगाव पोलिसांत तक्रार दाखल केली.
आरोपी अटकेत
पीडित मुलाच्या आईने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गावातील आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी विकी याला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

