भडगाव प्रतिनिधी | भडगाव ते पाचोरा दरम्यान मदरशाजवळ दोन दुचाकींच्या समोरा-समोर धडकेत दोघे ठार झाल्याची घटना घडली. दरम्यान, मृतातील एकाची विवाहाची बोलणी सुरू होती. मात्र या अपघातामुळे बोहल्यावर चढण्याआधीच त्याला काळाने गाठले. यामुळे मोरे कुटुंबावर आघात झाला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
घाटनांद्रा येथील बबलू उर्फ रामेश्वर शेनपडू मोरे (वय २३) हा सेंधवा येथून, निलेश लाकडिया बारेला (वय २५) याला सोबत घेऊन दुचाकीने (क्र.एम.एच.२०-डी.एन.५९६२) येत होता. भडगाव ते पाचोरा दरम्यान मदरशाजवळ समोरून येणार्या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. यात बबलू उर्फ रामेश्वर शेनपडू मोरे व निलेश लाकडिया बारेला हे दोघे जागीच ठार झाले. तर समोरच्या दुचाकीवर असणार्या तिघे जखमी झाले असून त्यांनी घटनास्थळावून पळ काढल्याने त्यांची ओळख पटू शकलेली नाही.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच कॉंग्रेसचा तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी अपघातस्थळी धाव घेऊन मृतदेह शासकीय रूग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली.