जळगाव प्रतिनिधी । शहरातील कांचन नगरात चार जणांनी झोपेत असलेल्या दोन भावंडांवर गोळीबार केल्याची घटना आज धडकी असून यात एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी तीन संशयित आरोपींना शनीपेठ पोलीसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी दिली आहे.
याबाबत असे की, कांचननगर परिसरात राहणारे मुरलीधर सपकाळे यांच्या घरावर चार ते पाच अज्ञात हल्लेखोरांनी आज सकाळी गोळीबार केला. मुरलीधर सपकाळे हे घराबाहेर खाटेवर झोपलेले होते. तर त्यांची दोन्ही मुले आकाश व सागर सपकाळे हे घरात झोपलेले होते. रिक्षातून आलेल्या हल्लेखोरांनी घरात घुसून झोपेत असलेले आकाश व सागर यांच्या अंगावरील चादर ओढून, गावठी पिस्तुलातून गोळीबार केला.
यावेळी हल्लेखोरांसोबत झटापट झाल्याने दोघे बचावले. झटापटीत आकाशच्या हाताला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे तर यावेळी झटापटीत हल्लेखोरांपैकी पळून जाण्याच्या प्रयत्नात पायरीवरून एक जण खाली पडल्याने त्याच्या डोक्याला जबर लार लागला. रक्तस्त्राव झाल्याने तो घटनास्थळीच पडून होता. जखमी झालेला तरूण आकाश सपकाळे आणि जखमी झालेला संशयित आरोपी विकी अलोने या दोघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
या गुन्ह्याप्रकरणी विकी उर्फ मयूर दिपक अलोने, सोनू अशोक सपकाळे, बापू आकाश सपकाळे यांना शनीपेठ पोलीसांनी अटक केली आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली आहे.