मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबादमधील कार्यक्रमातील एका विधानावरून शिवसेना-भाजपमध्ये युती होण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना आणि भाजपची खरंच युती होणार का? या प्रश्नावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी संजय राऊत यांनी एक गौप्यस्फोट सुद्धा केला आहे.
संजय राऊत यांनी म्हटलं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात जे वक्तव्य केलं ते ठाकरे स्टाईल भाषण होते. उद्धव ठाकरेंनी कुठेही म्हटलं नाहीये की, नवीन गठबंधन होईल, सरकार पडेल किंवा आम्ही या सरकारमधून बाहेर पडू. उद्धवजींचे स्पष्ट संकेत आहेत की ज्यांना भावी सहकारी व्हायचं आहे ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेत. त्यांनी बोट दाखवून, नाव घेऊन सांगितलं आहे आणि ज्या हालचाली राजकारणात दिसत आहेत. विशेषत: चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य की माजी मंत्री म्हणू नका. याचाच अर्थ असा की, कुणीतरी तिकडे आहे ज्यांना इथे यायचं आहे आणि उद्धवजींनी संकेत दिले आहेत की तुम्ही या. बरेच लोक येऊ इच्छितात असं म्हणत संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला आहे.
हे सरकार पूर्णपणे पाच वर्षे चालणार. शिवसेना शब्दाची पक्की आहे. शिवसेना कधी विश्वासघात करत नाही. शिवसेना पाठीत खंबीर खुपसत नाही. शिवसेना दिलेला शब्द मोडत नाही त्यामुळे हे सरकार पडेल. नवीन गठबंधन होईल या भ्रमात कुणीही राहू नये. कुणाला पतंक उडवत बसायचं असेल तर त्यांनी उडवावी तो पतंग कधी कापायचा हे माम्हाला माहिती आहे असं म्हणत संजय राऊतांनी शिवसेना-भाजप युती होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
नेमकं काय म्हणाले होते मुख्यमंत्री?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंचावर भाषण करण्यासाठी आले असता त्यांनी म्हटलं, “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माजी आणि भविष्यात एकत्र आले तर भावी सहकारी” असं म्हटल. मुख्यमंत्र्यांनी हे विधान रावसाहेब दानवे यांच्या समोर तसेच त्यांच्याकडे पाहून केल्याने विविध चर्चा रंगत आहेत.