जामनेर । जामनेर तालुक्यातील पहूर येथे बंद घर फोडून चोरट्यांनी तब्बल साडेबारा लाखाचा ऐवज चोरून नेण्याची घटना घडलीय. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
भुसार मालाचे व्यापारी अनिल रिखबचंद कोटेचा हे कुटुंबासह २५ ऑगस्टला राजस्थानला गेले होते. बंद घर असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी ९ लाख ७६ हजाराचे सोने व चांदीचे दागिने २ लाख ९० हजार रुपयांची रोकड असा एकूण ऐवज चोरून नेला.
२९ ऑगस्टला सायंकाळी सातच्या सुमारास कामावरील हमाल इकबाल इस्माईल शेख हा घरातील पंप बंद करण्यासाठी गेले होते. त्यावेळी मागील दरवाजाचा कडीकोयंडा आणि कुलूप त्यांना तोडलेले आढळले. त्यांनी याची माहिती अनिल कोटेचा यांना कळवली. यानंतर ३० ऑगस्टला अनिल कोटेचा यांनी घरी येऊन पाहणी केली. कपाटातील सोने, चांदीचे दागिने व रोकड चोरीला गेल्याचे त्यांना आढळले. सोमवारी सायंकाळी ठसेतज्ज्ञ व श्वान पथकाने घटनास्थळी पाहणी केली. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केल्याचे पोलिसांना दिसले. उपनिरीक्षक पी.एस. बनसोड तपास करत आहेत.