फेक वेबसाईट
सध्या लॉकडाऊनच्या काळात बरेच सायबर भामटे खोटे मेसेजेस व फेक वेबसाईट बनवून लोकांची आर्थिक फसवणूक करत आहेत. Mont Blanc या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या नावाने सध्या बरेच मेसेजेस व पोस्ट व्हायरल होत आहेत. या कंपनीने आपल्या आंतरराष्ट्रीय उत्पादनांवर विशेषतः त्यांच्या शाई पेन या उत्पादनावर बऱ्याच मोठ्या प्रमाणात लॉकडाऊनच्या काळात सूट दिली आहे व सर्वांनी त्यांच्या वेबसाईटवरून त्यांची उत्पादने विकत घ्यावीत . महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की जर तुम्हाला अशा कोणत्या प्रकारचा मेसेज आला व खालील पैकी कोणत्याही वेबसाईटचे नाव त्या मेसजमध्ये दिसल्यास त्यावर क्लिक करू नये. कारण त्या वेबसाईट या सायबर भामट्यांनी लोकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्याकरिता बनविलेल्या फेक वेबसाईट आहेत.
फेक वेबसाईटची नावे
Mont Blanc या आंतरराष्ट्रीय कंपनीचे अधिकृत विक्रेते हे टाटा क्लिक (Tata Cliq) आहेत व त्यांची वेबसाईट https://luxury.tatacliq.com/अशी आहे. त्यामुळे जर कोणत्याही नागरिकांनी वरीलपैकी कोणत्याही फेक वेबसाईटवर खरेदी केली असेल व त्यांना डुप्लिकेट वस्तू किंवा अजून खरेदी केलेल्या वस्तूंची डिलिव्हरी मिळाली नसेल तर त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये याची तक्रार द्यावी व www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर देखील त्याची नोंद करावी. असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक, सायबर विभाग यांच्या वतीने करण्यात येत आहे.
लॉकडाऊनच्या काळात राज्यात सायबर संदर्भात ४०४ गुन्हे दाखल झाले असून २१३ व्यक्तींना अटक केली आहे.अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे.
टिकटॉक ,फेसबुक ,ट्विटर व अन्य समाजमाध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात
महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण ४०४ गुन्ह्यांची (ज्यापैकी २० N.C आहेत) नोंद २० मे २०२० पर्यंत झाली आहे.
या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १७० गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १६१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत टिकटॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी १८ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ७ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, यूट्यूब ) गैरवापर केल्याप्रकरणी ४४ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २१३ आरोपींना अटक केली आहे. यापैकी १०२ आक्षेपार्ह पोस्ट्स टेक डाऊन (takedown) करण्यात यश आले आहे .
बीड जिल्ह्यात नवीन गुन्हा
बीड जिल्ह्यातील दिंदुड पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ४१ वर गेली आहे . सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या फेसबुक प्रोफाईलवर फिर्यादी हा कोरोनाग्रस्त रुग्ण आहे अशा आशयाची खोटी पोस्ट टाकून फिर्यादीस व त्याचा कुटुंबास बदनाम केले व समाजात आणि परिसरात फिर्यादीबाबत अफवा पसरविली .