जळगाव/चाळीसगाव (प्रतिनिधी)- श्रीनगर येथील दहशदवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान यश देशमुख यांचं यथोचित स्मारक उभारणार असल्याचा संकल्प केला असल्याची माहिती चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून ट्विट करून दिली आहे.

शाहिद जवान यश यांच्यावर आज त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी त्यांच्या पार्थिवाला त्यांच्या मूळगावी चाळीसगाव तालुक्याच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून आ. चव्हाण यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
राजदेहरे या ऐतिहासिक किल्ल्याच्या सानिध्यात व श्रीक्षेत्र गंगाआश्रम या देवभूमीच्या जवळ असलेली ही पिंपळगाव भूमी आता यश देशमुख या शूरविराच्या बलिदानाने ऐतिहासिक झाली आहे.अवघ्या २१ वे वर्ष वय हे काही जाण्याचे वय नाही,
यश देशमुख देशासाठी शहीद झाल्याने केवळ पिंपळगाव च नाही तर चाळीसगाव तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे.
देशासाठी बलिदान हे चाळीसगाव तालुक्याला नवीन नाही.
यापूर्वी देखील चाळीसगाव तालुक्यातील अनेक जवानांनी भारतमातेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यात यश देशमुख यांच्या बलिदानाने चाळीसगाव तालुक्याच्या अजून एका सुपुत्राचे नाव सुवर्णअक्षरांनी कोरले गेले आहे.अश्या भावना आमदार मंगेश चव्हाण यांनी ट्विट करून व्यक्त केल्या आहेत.
सर्वांच्या सहकार्याने शहीद जवान यश यांचे यथोचित स्मारक निर्माण करून त्यांच्या बलिदानाची आठवण व प्रेरणा पुढील पिढ्यानपिढ्या ठेवण्याचा संकल्प यानिमित्ताने करत असल्याचंही आमदार चव्हाण यांनी म्हटलं आहे.
















