मुंबई, (प्रतिनिधी)- वृत्तपत्रांच्या वितरणातून कोरोनाचा फैलाव होत नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) स्पष्ट केलेले असले तरीही काळजी म्हणून छपाईनंतर वृत्तपत्रांचे निर्जंतुकीकरण, सोशल डिस्टन्स आणि इतर काळजी घेऊन वृत्तपत्र विक्रेत्यांकडून वितरण सुरु आहे. असे असताना अचानक मार्गदर्शक सुचनांमध्ये बदल करुन घरोघरी वितरणावर बंदी घालण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तरी सदर निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघांचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी केली आहे.
कोरोनाच्या लढ्यामध्ये वृत्तपत्रे महत्वाची भूमिका बजावत आहेत. राज्य सरकारकडून सुरु असणारे अत्यंत चांगले व सकारात्मक प्रयत्न वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे तसेच जनजागृती करण्याचे कार्य वृत्तपत्रे करीत आहेत. वृत्तपत्रांच्या माध्यमातून विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचत आहे. याचमुळे वाचकांनाकडूनही वृत्तपत्रांना मागणी आहे. असे असताना राज्य शासनाने अचानक घेतलेला निर्णय चुकीचा असून हा निर्णय मागे घ्यावा, याबाबत आपण सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, सरचिटणीस विश्वास आरोटे, प्रदेशकार्याध्यक्ष किरण जोशी यांनी केली आहे.














