मुक्ताईनगर,(प्रतिनिधी)- मुक्ताईनगर सिव्हिल सोसायटी तर्फे हरित मुक्ताईनगर अभियान राबविण्यात येत आहे त्या माध्यमातून मुक्ताईनगर व परिसरात दरवर्षी 500 झाडे जगविण्याचा संकल्प सोसायटीने केलेला आहे यासाठी समाजाचा सहभाग असणे आवश्यक आहे म्हणूनच गेल्यावर्षी सोसायटीने एक आगळी वेगळी पर्यावरण पूरक वृक्षारोपण व संगोपन स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेचा भव्य दिव्य बक्षीस वितरण समारंभ नुकताच जैस्वाल लॉन्स येथे उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवातच दीपप्रज्वलना ऐवजी वृक्ष माऊलीचे पूजन करून करण्यात आली.
सदर कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून रमेश जी जाधव उपविभागीय कृषी अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी पाचोरा यांनी वृक्ष लागवडी संदर्भात अमूल्य असे मार्गदर्शन उपस्थित वृक्ष प्रेमींना केले. या सोबतच प्रमुख पाहुणे असलेल्या श्रीमती प्रणाली धर्माळे (वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण मुक्ताईनगर) यांनीही मोठमोठ्या झाडांसहित झाडाझुडपांचाही पृथ्वीवरील जैवविविधता टिकून ठेवण्यासाठी कसा उपयोग होतो याबद्दल माहिती दिली व पर्यावरण मित्र असलेले श्री प्रशांतराज तायडे पर्यावरण मित्र यांनीही पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण किती महत्त्वाचे आहे याबद्दल महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
या स्पर्धेमध्ये सोसायटीने पर्यावरण पूरक वृक्षांची 500 रोपे स्पर्धकांना मोफत उपलब्ध करून दिली होती या स्पर्धेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद परिसरातील पुरुष, महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी ज्येष्ठ नागरिकां तर्फे मिळाला या माध्यमातून 500 पैकी जवळ जवळ 350 रोपांची लागवड यशस्वी झाली सोसायटीच्या सर्वेक्षण टीमने प्रत्येक लागवडीच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन सर्वेक्षण केले व लावलेल्या रोपाची संरक्षण व्यवस्था, लागवडीचे ठिकाण, स्पर्धकाचा उद्देश्य, रोपाची वाढ इत्यादी बाबी विचारात घेऊन गुणांकन केले व त्यातून पहिले दुसरे आणि तिसरे क्रमांक निवडले गेले इतर सहभागी स्पर्धांना प्रमाणपत्र व मेडल देऊन गौरवण्यात आले. स्वयंस्फूर्तीने वृक्षारोपण करणाऱ्या वृक्षप्रेमींचाही गौरव या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या सर्व स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वृक्षारोपण व संगोपन साठी पहिला क्रमांक कु. समृद्धी कपिल जंगले दुसरा क्रमांक कु आराध्या राहुल भंगाळे व आराध्या अनिल महाजन तिसरा क्रमांक प्रसाद अशोक सातपुते यांनी पटकावला.विजेत्यांना ट्रॉफी प्रमाणपत्र व मेडल देवून गौरविण्यात आले.सोसायटीने जाणीवपूर्वक या कार्यक्रमाला भव्य दिव्य स्वरूप दिले आजच्या घडीला सजीव सृष्टीच्या अस्तित्वासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणा शिवाय पर्याय नाही मात्र वृक्षारोपण करणाऱ्या व्यक्तीला समाजात विशेष असे महत्व दिले जात नाही जेव्हा की ते सर्वात मोठे सामाजिक कार्य करत असतात. वृक्षप्रेमींना समाजात मानाचे स्थान व वागणूक मिळावी ते निस्वार्थ भावनेने करत असलेल्या कार्याची दखल समाजाने घ्यावी यासाठी या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे व कार्यक्रमाचे आयोजन सोसायटीतर्फे करण्यात आल्याचे सोसायटीने सांगितले.