जळगाव ;- वंचित बहुजन आघाडीला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे येत्या विधान सभेत वंचित बहुजन आघाडी २८८ जागा लढवणार असल्याचे माजी मंत्री तथा जिल्हा निरीक्षक दशरथ भांडे यांनी बुधवारी पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
भारतीय जनता पक्षात इतर पक्षांचे इनकमिंग सुरू आहे. मात्र, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत, असेच लोक त्यांच्याकडे जात आहेत. या आधी वंचित आघाडीला ४२ लाख मते मिळाली आहेत. मात्र, येत्या निवडणुकीत एक कोटी पेक्षा अधिक मते वंचित आघाडीला मिळतील, असेही या वेळी माजी मंत्री भांडे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आज राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची काय स्थिती आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. राजकारणात आज मोठी पोकळी आहे. राज्यातून काँग्रेसचे अस्तित्व संपल्यात जमा आहे. तर राष्ट्रवादीची स्थितीही वाईट असल्याचे दिसत आहे. याला पर्याय म्हणून वंचित बहुजन आघाडी याला पर्याय म्हणून उभा असल्याचेही माजी मंत्री भांडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी वंचित आघाडीचे पदाधिकारी विनोद सोनवणे, प्रमोद इंगळे, छाया सावळे, सुधा ठाकूर, विवेक ठाकरे, हरिश्चंद्र सोनवणे, संगीता भामरे, रेखा शिरसाळे, शमिबाबी शेख आदी उपस्थित होते.















