चौफेर टीकेनंतर सरकारने निर्णय बदलला
मुंबई : चौफेर टिके नंतर पूरग्रस्तांना मदत निधी सरकारकडून रोख रक्कमेने देण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे. सुरूवातीला हा मदत निधी पुरग्रस्तांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येणार होता परंतु, या निर्णयावर चौफेर टीका झाल्यानंतर आता सरकारकडून या निर्णयात बदल करत आता पुरग्रस्तांना रोख रक्कम देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच नागरिकांना रोखीने मदत करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
ज्या ठिकाणी लोकांना गरज आहे त्याठिकाणी पैसे देण्यात यावेत असे सरकारकडून देण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे. अगोदर सरकारने दिलेल्या आदेशात पुरग्रस्तांना देण्यात येणारा मदत निधी बॅंक खात्यात जमा करण्यात यावेत असे आदेश दिले होते परंतु, पुरात बॅंकांसह अन्य महत्वाची कागदपत्रे वाहून गेल्याची परिस्थिती अनेक ठिकाणी आहेत त्यामुळे सरकारवर सर्व बाजूने टीका करण्यात आली होती. त्यानंतर सरकारने आपला निर्णय बदलत पुरग्रस्तांना रोख रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत.