मुंबई : राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नावांमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांना धक्का बसला आहे. राजू शेट्टींऐवजी नवीन नाव नमूद करुन या निवदेनावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या स्वाक्षरीसह राज्यपालांकडे देण्यात आले आहे.
राज्य सरकारने विधान परिषदेच्या 12 रिक्त जागांसाठीची यादी राज्यपालांकडे पाठवण्यात आली होती. पण त्यावर अद्याप काहीच निर्णय झालेला नाही. विधान परिषदेच्या यादीमध्ये आपले नाव देण्यात यावे यासाठी राजू शेट्टी यांनी वर्षभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची बारामतीमध्ये भेट घेतली होती. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली होती. त्यानंतर राजू शेट्टी यांचे नाव या यादीमध्ये टाकण्यात आले होते.
दरम्यानच्या काळात शेट्टी यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांचे दोन मोठे मोर्चे काढले. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये तीव्र नाराजी पसरली. ज्यांना आपण सरकारमध्ये घेण्याची तयारी दर्शवली आहे, तेच सरकारच्या विरोधात जात असतील तर अशा व्यक्तीला सोबत न घेतलेले बरे अशी चर्चा महाविकास आघाडीत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, राजू शेट्टी यांच्या जागी माजी सदस्य, राष्ट्रवादीचे कोषाध्यक्ष हेमंत टाकले यांचे नाव राज्यपालांना देण्यात आल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. मात्र त्याला कोणीही दुजोरा द्यायला कोणीही तयार नाही. हे नाव चार प्रमुख नेत्यांशिवाय कोणालाही माहिती नाही.