मुंबई – महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर प्रदेशाध्यक्ष पदावर राज्यातील भाजपच्या नेत्यांची निराशा झाली आहे. भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोथरूडचे आमदार चंद्रकात पाटील यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. तर, मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांनाच कायम ठेवण्यात आलं आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज याबाबत घोषणा केली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात भाजप क्रमांक एकच पक्ष म्हणून पुढं आला होता. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांचाही बराच वाटा होता. मात्र, राज्यात सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं. सत्ता गमवावी लागल्यानंतर भाजपमध्ये संघटनात्मक बदलांची चर्चा सुरू झाली होती. विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारले गेलेले विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, निवडणूक लढूनही पराभूत झालेल्या पंकजा मुंडे हे नाराज नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक होते. त्यामुळं प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार, याविषयी उत्सुकता होती. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे व अमित शहा यांचे विश्वासू मानल्या जाणाऱ्या पाटील यांच्याच गळ्यात पुन्हा ही माळ पडली आहे.
मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांनाच कायम ठेवण्यात आलं आहे. शिवसेनेनं राष्ट्रवादी व काँग्रेसशी महाआघाडी केल्यानं मुंबईच्या अध्यक्षपदी मराठी चेहरा दिला जावा, अशी अपेक्षा पक्षात व्यक्त होत होती. शिवसेनेला शिंगावर घेणाऱ्या आशिष शेलार यांनाच हे पद मिळेल, असंही बोललं जात होतं. मात्र, ती अपेक्षाही फोल ठरली आहे. आमदार लोढा यांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे.















